यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्राला समृद्ध वैचारिक वारसा मिळाला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच महाराष्ट्र अग्रेसर राहिला. मात्र, अलीकडे विरोधी मतांचा आदर न करण्याची मानसिकता असल्याने आजचा महाराष्ट्र विचारांना घाबरणारा असल्याची खंत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या ३३व्या स्मृतिदिनानिमित्त गिरीश कुबेर यांचे ‘यशवंतराव चव्हाण यांनी उराशी बाळगलेल्या स्वप्नातील महाराष्ट्र किती पुढे गेला’ या विषयावर भाषण झाले. या वेळी अरुणा सबाने यांना यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल राम प्रधान होते. या वेळी प्रतिष्ठानचे गिरीश गांधी, माजी खासदार दत्ता मेघे आणि राम खांडेकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिल्याचे स्पष्ट करून कुबेर म्हणाले की, इतर राज्यांमध्ये जमीन हस्तांतरणाच्या संदर्भात वाद उफाळून आले. तसे महाराष्ट्रात घडले नाही. त्याला कारण यशवंतरावांची धोरणे होती. १९६०मध्ये सत्तेत आल्यानंतर चव्हाण यांनी तात्काळ विविध शहरांमध्ये एमआयडीसी आणि उद्योगांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी वित्त महामंडळांची निर्मिती केली. आजच्या सारखे एखाद्याच उद्योगाला लाभ पोहोचावा म्हणून शासनकर्त्यांनी धोरणे आखण्याची तेव्हाची पद्धत नव्हती. आपल्या व्यवस्थेत पूर्वीसारखी दूरदृष्टी असलेली माणसे निपजत नाहीत. केवळ पूल, रस्ते बांधणे, कालवे काढणे किंवा एक खिडकी योजना राबवणे म्हणजे विकास नव्हे. विकासासाठी यशवंतरावांसारखी दूरदृष्टी असावी लागते. विरोधी मतांचाही प्रगल्भतेने सन्मान करणारी ही भूमी आज विचारांना घाबरत आहे. यामुळे महाराष्ट्र पुरोगामी आहे असे म्हणण्याची सोय आता उरलेली नाही, असेही कुबेर यांनी स्पष्ट केले.
राम प्रधान या वेळी म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांनी मोजक्याच विचारशील आणि राजकीय विचारकांची चांगली मोट बांधली होती. पिंड राजकारणी होता आणि टिळकांचा ध्येयवाद त्यांच्या अंगात मुरलेला होता. चांगल्या माणसांच्या सहवासाने देशप्रेम, स्वार्थत्याग आणि दूरदृष्टी रुजली. एमआयडीसीची योजना त्यांचीच होती. कोल्हापूरला जिल्हाधिकारी असताना त्यांचे काम जवळून पाहावयास मिळाले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रदीप विटाळकर यांनी केले तर प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. दीपक निलावार यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रेम लुनावत, सागर खादीवाला, निशिकांत काशीकर, सलीम शेख, समीर सरफ आदींचे सहकार्य लाभले.
अरुणा सबाने सन्मानित
राम प्रधान यांच्या हस्ते अरुणा सबाने यांना १५ हजारांचा धनादेश, शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना अरुणा सबाने यांनी गिरीश गांधी सतत चळवळीतील स्त्रियांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सातत्याने काम करत असताना फळाची अपेक्षा करू नये हे खरे असले तरी कौतुक कुणाला नको असते? योग्य व्यक्तींच्या हातून सन्मान मिळत असेल तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो, असेही त्या म्हणाल्या.