यवतमाळ : येत्या जिल्हा परिषद निवडणुकींची ‘ट्रायल रन’ ठरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कुठे प्रस्थापितांना धक्का, तर कुठे नवख्यांना संधी, असे चित्र आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, पुसद, महागाव, दिग्रस, नेर आणि बाभूळगाव या सात बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान झाले. मतदारानंतर लगेचच संबंधित तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी झाली. रात्री उशिरा या निवडणुकांचे निकाल लागले.

पालकमंत्री संजय राठोड यांना त्यांच्या दिग्रस या गृह मतदारसंघातील बाजार समितीत पराभवास सामोरे जावे लागले. मात्र त्यांच्या नेतृत्वात शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीने नेर कृषी उत्पन्न बाजार समिती राखण्यात यश मिळविले. येथे १८ पैकी १० जागांवर शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीने विजय मिळविला. शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आघाडीने आठ जागा मिळविल्या. काँग्रेसचे तेलंगणा प्रभारी तथा माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना हा धक्का मानला जात आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गज काँग्रेससोबत असताना नेरमध्ये काँग्रेसची पिछेहाट ही पक्षासाठी धोक्याची घंटा असल्याची चर्चा आहे.

shiv sena workers stopped narayan rane campaigning
रत्नागिरीत प्रचारपत्रकावरून भाजप-सेनेचे नाराजीनाटय
Ashok Chavan, Voters called
अशोक चव्हाणांच्या मंत्रिपदासाठी मतदारांना भावनिक साद!
Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप

हेही वाचा – चंद्रपूर : बारा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

दिग्रसमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकल्या. येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या शिंदे गट आणि भाजपाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. संजय राठोड यांच्याबद्दल दिग्रसमध्ये धुमसत असलेली नाराजी बाजार समितीच्या निवडणुकीतून व्यक्त झाल्याचे बोलले जात आहे. यवतमाळमध्ये काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बाजार समितीवर एकहाती वर्चस्व मिळविले. काँग्रेसचे नेते बाळासाहेब मांगुळकर आणि उद्धव ठाकरे गटाचे संतोष ढवळे यांच्या नेतृत्वात ११ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. येथे भाजपाला चार आणि अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळविला.

वणी बाजार समितीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात भाजपाचे १४ उमेदवार विजयी झाले. तर शिवसेना उद्धव ठाकरे व काँग्रेस महाविकास आघाडीस केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. यातील तीन जागा शिवसेनेच्याच आहेत. त्यामुळे वणीत ग्रामीण भागातही काँग्रेसची पकड सैल झाल्याची चर्चा आहे.

राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या पुसद बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या नेतृत्वातील मनोहरराव नाईक शेतकरी सहकारी पॅनलने सर्व १८ जागा जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले. मनोहर नाईक यांचे पुतणे, भाजपाचे आमदार ॲड. निलय नाईक यांच्या नेतृत्वातील पॅनलला पराभवास सामोरे जावे लागले. पुसदमध्ये कोणत्याच निवडणुकीत भाजपाला वर्चस्व सिद्ध करता आलेले नाही. त्यामुळे भाजपाने निलय नाईक यांना विधान परिषदेची आमदारकी देवून त्याचा पक्षाला किती उपयोग झाला, याचे चिंतन आता पक्षात वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – आष्टीत काँग्रेसची एकहाती सत्ता; भाजपाने बाजार समिती गमावली

पुसदमध्ये मनोहर नाईक यांनी वर्चस्व सिद्ध केले तर महागावमध्ये मात्र त्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जादू ओसरल्याचे चित्र बाजार समितीच्या निवडणुकीतून पुढे आले. येथे १८ जागांपैकी भाजपा व शिंदे गटाने ११ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसला पाच तर काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. बाभूळगाव बाजार समितीत सत्ताधारी शिंदे व भाजपा गटास हादरा बसला. येथे १८ पैकी १४ जागांवर विजय मिळवून महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले. चार जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले.

विविध गटांसाठी झालेल्या या निवडणुकीतही यावेळी सामिष-आमिष हे प्रकार चालले. मात्र मतदारांनी नेत्यांच्या मागे जाण्यापेक्षा जे खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या योग्यतेचे उमेदवार आहेत, अशांनाच संधी दिल्याचे निकालानंतर दिसत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येत्या निवडणुका कोणत्याही पक्षास सहज-सोपी नाहीत, असा संदेश बाजार समितीच्या निवडणुकींमधून मतदारांनी दिला आहे.