नागपूर : राज्य आणि देशातील उच्चशिक्षित विद्यार्थी आधीच बेरोजगारीची झळ सोसत असताना ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था’ (नीरी)ने सहायक तंत्रज्ञ पदाच्या भरतीसाठी २०१९ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल तीन वर्षे होऊनही जाहीर केलेला नाही.पर्यावरणाच्या समस्यांवर वैज्ञानिक संशोधन करून समाधान साधणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नीरीचे महत्त्व सर्वश्रूत आहे. मात्र, स्वायत्त संस्था म्हणून मान्यता असूनही एका परीक्षेचा निकाल लावण्यात दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे. संस्थेने सहायक तंत्रज्ञ या पदाच्या भरतीसाठी २०१९ मध्ये परीक्षा घेतली होती. निकालाची प्रतीक्षा असलेल्या काही उमेदवारांनी या ढिसाळ कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘नीरी’ने तीन गटांत सहायक तंत्रज्ञ ग्रेड २, ३, च्या दहा पदासाठी २०१८ मध्ये जाहिरात काढली होती. जवळपास २००० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये बी.एस्सी.सह एम.एस्सी. व अभियांत्रिकीचे उमेदवारही होते. त्यातून निवडलेल्या २०० च्या आसपास उमेदवारांची २९ सप्टेंबर २०१९ रोजी परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षा घेतल्यानंतर ‘नीरी’चे प्रशासन ही भरतीच विसरले की काय, असा प्रश्न उमेदवार विचारत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन वर्षांपासून निकाल लागत नसल्याने यशस्वी होण्याचा विश्वास असलेल्या उमेदवारांच्या पदरी निराशा आली आहे. या परीक्षेतील उमेदवारांनी राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून इतर संस्थांकडेही तक्रार नोंदवली.  मात्र, यानंतरही संस्थेने निकालाची प्रक्रिया सुरू केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतीप्रक्रियेमध्ये काही त्रुटी असल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, नीरीने जाहिरात काढताना सर्व नियमांचे पालन केले नाही का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुठलीही भरती प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान एक वर्षांचा कालावधी पुरेसा आहे. असे असतानाही तीन वर्षांपासून परीक्षा होऊन निकाल जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांकडून नीरी प्रशासनावर विविध आरोप केले जात आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ignoring assistant technician post result by neeri ysh
First published on: 22-11-2022 at 00:02 IST