नागपूर : मुलीच्या लग्नासाठी वरसंशोधनाची तयारी सुरू असतानाच वृद्ध दाम्पत्याचा घरगुती कारणावरून वाद सुरु झाला. त्यांचा वाद चक्क घटस्फोटापर्यंत पोहोचला. नंतर दोघेही भरोसा सेलमध्ये पोहचले. दोघांचेही समूपदेशन करण्यात आले. अखेर त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले आणि एकाच कारमधून घरी परतले.

६५ वर्षाचे सखाराम (बदललेले नाव) हे रेल्वे विभागातून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठे घर बांधले. पत्नी मुलगा व मुलीसह राहतात. मुलीचे अभियांत्रिकीपर्यंत शिक्षण झाले आहे. मुलाने स्टेशनरीचे मोठे दुकान आहे. मुलीचे लग्न ठरविण्यासाठी दाम्पत्याचे वरसंशोधन सुरु आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सखाराम आणि पत्नीत घरगुती कारणावरून वाद सुरु झाले. वादाने मोठे गंभीर रूप घेतल्याने महिन्याभरापूर्वी सखाराम यांनी पत्नीला मारहाण केली. त्यामुळे पत्नीचाही स्वाभिमान दुखावला. तिनेही माहेरी जाण्याची धमकी दिली. रागाच्या भरात सखाराम यांनीही पत्नीची कपड्याची पिशवी घराबाहेर फेकली. मुलगा आणि मुलीने समजूत घातली. मात्र, पत्नी रागाच्या भरात भावाकडे निघून गेली. दुसरीकडे मुलीला बघायला पाहुणे घरी येते होते.

हेही वाचा : बँक खाते उघडण्‍यासाठी ५० हजार रुपयांचे कमिशन; सायबर लुटारूंकडून….

पत्नी घरात नसल्यामुळे सखाराम यांच्यासाठी ते अडचणीचे ठरत होते. गेल्या महिन्याभरापासून दोघेही पती-पत्नी विभक्त असल्यामुळे सखाराम यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पत्नीच्या भावाला फोनवरून शिवीगाळ करीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. दोन्ही कुटुंब बेलतरोडी पोलीस ठाण्यात पोहचले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत पोलिसांकडे तक्रारी केल्या. बेलतरोडी पोलिसांनी दोघांचीही तक्रार ऐकून घेतली आणि त्यांना भरोसा सेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा : पुन्हा एक वाघ कायमचा पिंजऱ्याआड….

स्वाभिमान दुखावला

पतीने चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केल्यामुळे पत्नीचा स्वाभिमान दुखावला. त्यामुळे तिने पतीसह न राहता भावाकडे राहण्याचा निर्णय घेतला. सखाराम यांनीही आता पत्नी घरात नकोच, अशी भूमिका घेत भरोसा सेलमध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही तक्रारी आणि त्यांची बाजू भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी ऐकून घेतली. समूपदेशक सुनीता कोडपाल यांनी समूपदेशन केले. त्यानंतर सखाराम यांचीही समजूत घातली. मुलीच्या लग्नाची तयारी करण्याची वेळ असताना घडलेला वादावर पांघरुन घालण्याचा सल्ला देण्यात आला. एकमेकांचे समोरासमोर समूपदेशन केल्यानंतर दोघांच्याही मनातील राग कमी झाला. दोघांच्याही डोक्यातून घटस्फोटाचे भूत बाहेर निघाले. नंतर हे वृद्ध दाम्पत्य एकाच कारने घराकडे निघाले.