नागपूर : केंद्र व राज्य शासनाकडून नागरिकांना अवयवदानाचे आवाहन केले जाते. परंतु नागपुरातील एम्स वगळता विदर्भातील एकाही शासकीय रुग्णालयांना अवयव दाता मिळवण्यात यश आलेले नाही. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये २४ मेंदूमृत अवयवदात्यांपैकी २० दाते हे गैरशासकीय रुग्णालयातील होते. नागपुरातील विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या पुढाकारातून विदर्भात अवयवदात्यांची संख्या १ जानेवारी ते आजपर्यंत २४ वर गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या मेंदूमृत अवयवदात्यांमध्ये ४ रुग्ण एम्स रुग्णालयातील होते. ते वगळता इतर शासकीय रुग्णालयांचे चित्र समाधानकारक नाही. त्यामुळे विदर्भात अवयव दानाचा उपक्रम केवळ खासगी आणि ट्रस्टच्या रुग्णालयांच्या बळावरच सुरू असल्याचे दिसते. सर्वाधिक अवयवदाते हे नागपूर जिल्हयातील होते. येथे १४ मेंदूमृत रुग्णांनी अवयवदान केले. वर्धेतील ३ रुग्ण, मध्य प्रदेशातील २, यवतमाळमधील १ रुग्ण, मुंबईतील एक रुग्ण, अमरावतीतील एक, गडचिरोलीतील एक व वाशीममधील एका रुग्णाचेही अवयवदान करण्यात आले. त्यातून काहींना जीवदान मिळाले.

हेही वाचा : चित्ते आता नामिबियाऐवजी दक्षिण आफ्रिकेतूनच; प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सरकाचे सावध पाऊल

विदर्भातील रुग्णालयांची स्थिती…

नागपुरात मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, एम्स ही टर्शरी दर्जाची रुग्णालये आहेत. तर येथे दोनशेच्या जवळपास मोठी खासगी रुग्णालये आहेत. सोबत विदर्भातील अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. वाशीम, वर्धा, अमरावती, भंडारा, गडचिरोली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्येही जिल्हा रुग्णालय आहे. एवढी रुग्णालय असूनही येथून एकही दानदाता मिळाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा : नागपूर : जवाहर बाल मंचच्या माध्यमातून मुलांमध्ये काँग्रेस…

अवयव प्रत्यारोपणाची स्थिती…

विदर्भात २४ मेंदूमृत रुग्णांनी अवयवदान केले. यातून नागपूरसह देशाच्या विविध रुग्णालयांत ४४ रुग्णांमध्ये अपयव प्रत्यारोपित करण्यात आले. २४ बुब्बुळही विविध नेत्रपेढीला मिळाले. “विदर्भात अवयव प्रत्यारोपणाला चांगला प्रतिसाद असून आता मृत रुग्णाचे नातेवाईक स्वत:हून अवयव दानासाठी पुढे येत आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये मेंदूमृत दानदाते वाढल्यास निश्चितच चळवळीला आणखी गती मिळेल.” – डॉ. संजय कोलते, अध्यक्ष, विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur government hospitals failed to get organ donors except aiims hospital mnb 82 css