वर्धा: स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा परिषदेने संकल्प केला. या दिवशी चार हजार चौरस फुटांची रांगोळी काढायची. चोवीस तासात हे आव्हान पेलायचे होते. पण अद्याप रांगोळी चितारणे सुरूच आहे. कलाकार आशिष पोहाणे, विशाल जाचक, सुषमा बाळसराफ, करिश्मा जलान, अजय उईके यांच्या मार्गदर्शनात रांगोळी आकारास येत आहे. रांगोळीत महात्मा गांधी व अन्य राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा साकार होत आहे. विविध अकराशे किलोची रांगोळी यात वापरली जात आहे. जिल्हा क्रीडा संकुलात काढण्यात येत असलेली ही रांगोळी पाहण्यास नागरिक आतुर झाले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, समन्वयक डॉ. ज्ञानदा फणसे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी ही रांगोळी एक आठवण म्हणून जपण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थी, नागरिक यांना ही कला पाहण्यास प्रोत्साहित केले जात आहे.