वनविभागासमोर आव्हान

नागपूर : टाळेबंदीत जंगल आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी वनखात्याची यंत्रणा सज्ज असली तरीही गेल्या काही दिवसात मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली. टिपेश्वर अभयारण्यात तीन शिकाऱ्यांना अटक झाली असली तरीही त्यांच्या अभयारण्यातील प्रवेशाने वनखात्यासमोर आव्हान उभे के ले आहे.

बुद्ध पौर्णिमेला होणारी मचाणावरील वन्यप्राणी गणना गेल्या काही वर्षांपासून रद्द करण्यात आली आहे. त्याला निसर्गानुभव असे नाव देऊन मात्र वन्यजीवप्रेमींना पाणवठय़ावर येणाऱ्या प्राण्यांना न्याहाळण्याची संधी दिली जाते. यंदा करोनाच्या टाळेबंदीने निसर्गप्रेमींचा हा हक्क हिरावला गेला. वनखात्याकडून रद्द झालेल्या निसर्गानुभवाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही शिकाऱ्यांकडून करण्यात आला. प्रादेशिक विभागाचे एक अधिकारी पाणवठय़ाजवळील मचाणावर असताना त्यांना अभयारण्याजवळ तीन जण संशयास्पद स्थितीत फिरताना दिसले. त्यांनी तातडीने भ्रमणध्वनीवरून कार्यालयात संदेश पाठवला. दरम्यान ते इसम दर्यापूर, ठाणेगाव, पिंटापुंगरी, वडवाट, खरी या गावांच्या दिशेने गेल्याची माहिती पांढरकवडा येथील प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक तथा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी सुरेश टेकाम, पोतू टेकाम, दिलीप टेकाम या आरोपींना वडवाट या गावातून त्यांच्या राहत्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी सुरेश टेकाम याच्या घरातून चितळाचे शिंग, मोरांची पिसे, सत्तुर, सुरी, भाले, शिकारीचे जाळे आदी साहित्य मिळाले. पोतु टेकाम यांच्या घरात मोराची पिसे सापडली. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.

पुढील कार्यवाही यवतमाळ प्रादेशिक विभागाचे वनसंरक्षक रवींद्र वानखडे, पांढरकवडा प्रादेशिक विभागाच्या उपवनसंरक्षक के .एम. अभर्णा, सहाय्यक वनसंरक्षक बन्सोड व दुमारे यांच्या मार्गदर्शनात पांढरकवडा प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रोंत खाडे, क्षेत्र सहाय्यक डी.ए. मेश्राम, व्ही.एम. दुबे यांनी केली.