ज्योती तिरपुडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील तीन लाख बचत गटात सहभागी झालेल्या व उद्यमशीलतेच्या वाटेवर असलेल्या ३० लाख महिलांचा व्यवसाय केवळ प्रदर्शनापुरता मर्यदित न राहता बाजारपेठेशी जोडला जाण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. येथे आयोजित राज्यस्तरीय प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिला उद्योजकांशी बातचीत केल्यानंतर त्यांना मोठय़ा बाजारपेठेची आस असल्याचे जाणवले. उद्योग विश्वात महिलांनी घेतलेली ही भरारी एका नव्या बाजारपेठेची नांदी देणारी ठरू शकेल, अशीच आहे.

आजमितीस राज्यात जिल्हा विभाग व राज्यस्तरीय अशी ४४ प्रदर्शने दरवर्षी भरतात. येथील प्रदर्शनाच्यानिमित्ताने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी विदर्भातील उद्योजक व व्यापाऱ्यांना निमंत्रित केले. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन व नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी यामहिलांशी संवाद साधला. त्यातून या गटांच्या अनेक वस्तूंना बाजारपेठ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, असे ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नेटके यांनी सांगितले. सुरतमध्ये कापड व्यवसाय मोठा आहे. त्यांना लागणारे कापड पुरवण्याची तयारी काही बचत गटांनी दाखवली असून हा करार पुढे नेण्यासाठी बोलणी सुरू झाली आहे, मौद्याजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग तयार करणारा एक गट आता प्रदर्शनात येणे बंद झाले आहे. कारण त्यांना बाजारातून भरपूर ऑर्डर मिळू लागले आहेत. जुन्या गटांनी बाहेर पडणे व नव्या गटांनी आत येणे हे जेव्हा मोठय़ा संख्येत सुरू होईल तेव्हाच महिला सक्षमीकरणाचा हा प्रवास पुढे जाईल, असे नेटके म्हणाले.

प्रत्येक गटाला दरवर्षी प्रदर्शनात संधी मिळतेच असे नाही. येथेही वशिलेबाजी वगैरे चालते. अनेकदा बाहेरच्या राज्यात मिळणारे प्रदर्शनाचे स्टॉल मंत्र्यांचे नातेवाईकच लाटतात, असे मत सांगलीच्या शोभा शेवाळे यांनी व्यक्त केले. राज्यभरात सध्या ३० लाख महिला या गटांच्या माध्यमातून लघु उद्योगाच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्यांच्याजवळ कौशल्ये, भांडवल आहे. मात्र, बाजारपेठ नाही.  उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा सेतू अजूनही ठिकठिकाणी तयार झालेला नाही. त्यामुळे प्रदर्शन संपले की पुढे काय, असा प्रश्न या गटांसमोर उभा ठाकतो. या पातळीवर शासकीय यंत्रणेने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत यात सहभागी झालेल्या अनेक गटांनी व्यक्त केले. या गटांत सहभागी झालेल्या महिलांच्या हाताला काम मिळते. ते केवळ मजुरीपुरते मर्यादित न राहता. उत्पादनाच्या नफ्यातील वाटा त्यांना मिळणे गरजेचे आहे.  असे मत यात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केले.

बकरीच्या दुधापासून साबणाचा उद्योग यवतमाळच्या एका विदर्भ पशू संसाधन उन्नती केंद्र बचत गटाने तयार केला. त्याला प्रचंड मागणी होती. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या शिष्टमंडळाला साबणात सुगंध आणखी हवा होता. तसा बदल करण्यास व्हीआयएने त्यांना सांगितले. अशा २५० साबणाचे नमूने गटाने प्रदर्शनास विक्रीस ठेवले होते. ते सर्व संपले. चार क्विंटल खत आणि नीम तेल त्यांनी विक्रीस आणले होते. त्यांचा सर्व माल विकला गेल्या. प्रदर्शनात बचत गटांचा एक कोटीची माल विकला गेला. या सर्व गटांच्या महिलांची दिवाळीनंतर बैठक बोलावून त्यांना सॉफ्ट स्किल शिकवले जाणार आहे.’’

– मकरंद नेटके, प्रकल्प प्रमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industry share of women savings groups
First published on: 03-11-2018 at 02:29 IST