लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : अमरावतीच्या एका तरुणाने इंस्टाग्रामवर शहरातील तरुणीशी मैत्री केली. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दोन वर्षांपर्यंत तिचे लैंगिक शोषण केले. लग्नासाठी बोलणी केली असता तिला मारहाण केली. तसेच बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. पीडितेने पोलिसात तक्रार केली. तहसील पोलिसांनी २० वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी तरुणावर गुन्हा नोंदविला आहे. फरजान गफ्फूर शाह (२९) रा. अमरावती, असे आरोपीचे नाव आहे.

आणखी वाचा-नागपूर: वर्षभरात ८४ हजार नवीन वीज जोडण्या; ई- वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठीही…

पीडित तरुणी कामठी परिसरात राहते. २०१९ मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची ओळख फरजानशी झाली. दोघांची मैत्री होऊन प्रेमसंबंध निर्माण होण्यास वेळ लागला नाही. फरजान हा तरुणीला भेटण्यासाठी नागपूरला येत होता. तहसील ठाण्यांतर्गत एका लॉजमध्ये खोली भाड्याने घेत होता. वेळोवेळी त्याने लॉजमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. जानेवारी महिन्यात तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता फरजानने स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन फरजानने तरुणीला मारहाण केली. पुन्हा संपर्क केल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. अखेर तरुणीने प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून फरजानचा शोध सुरू केला आहे.