१ हजार प्रजातींचा शोध -आयझ्ॉक किहीमकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फुलपाखरांसाठी जगभर फिरणे वेगळे आणि फुलपाखरांनी जगाची ओळख करून देणे वेगळे, या दोन्ही बाबी म्हटल्या तर एकच, म्हटल्या तर वेगवेगळ्या आहेत. ‘बटरफ्लाय मॅन ऑफ इंडिया’ आयझ्ॉक किहीमकर यांना फुलपाखरांनी भारतभ्रमण करायला लावले. गेल्या तीन दशकाहून अधिक काळापासून ही व्यक्ती फुलपाखरांच्या सानिध्यात भारतभ्रमण करीत असून त्यांचे आणि फुलपाखरांचे नाते आता ‘बटरफ्लाय ऑफ इंडिया’ या पुस्तकातून समोर येत आहे.

स्वभावत:च निसर्गाशी नाळ जुळलेली ही व्यक्ती तीन दशकांपूर्वी बीएनएचएसमध्ये (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) ग्रंथपाल म्हणून रुजू झाली. दरम्यान, बीएनएचएसच्याच माहिती व जनसंपर्क विभागाचा कार्यभार आणि इतर भूमिका पार पाडत आता बीएनएचएसचे उपसंचालक व कार्यक्रम संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. आयुष्यात विविधांगी भूमिका पार पाडत असताना निसर्गाचे आणि त्यांचे नाते फुलपाखरांनी घट्ट केले. मुंबईच्या आसपासच फुलपाखरांच्या तब्बल १५० जाती, उपजाती त्यांनी शोधून काढल्या, तर पश्चिम घाटात सुमारे ३५० जाती, उपजातींचा शोध लावला. नागालँड, सिक्कीममध्येच सुमारे ९०० फुलपाखरांच्या जाती त्यांना आढळल्या, त्यामुळे त्यांच्याच शब्दात सांगायचे, तर नागालँड, सिक्कीम म्हणजे फुलपाखरांच्या बाबतीत ‘अलिबाबाची गुहा’च आहे. फुलपाखरांची आजवर अनेक पुस्तके आली, पण ‘बटरफ्लाय ऑफ इंडिया’ या पुस्तकातून त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यातील सुमारे एक हजारावर फुलपाखरांच्या जाती, उपजातींचा समावेश केला आहे. भारतच नव्हे, तर पाकिस्तान, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, म्यॉनमार या देशातही फुलपाखरांचे तेवढेच सुंदर जग सामावले आहे आणि त्याचा अभ्यास या पुस्तकातून अभ्यासकांना करता येणार आहे. एकटय़ा भारतातच फुलपाखरांच्या १५०० हून अधिक जाती, उपजाती असून त्यातील एक हजार जाती, उपजाती आयझ्ॉक किहीमकर यांनीच शोधून काढल्या आहेत. सुरुवातीला फुलपाखरांच्या ६३५ जाती, उपजातींचा शोध घेतला, तर अलीकडेच त्यांच्या शोधाची संख्या हजारावर गेली आहे.

‘बटरफ्लाय ऑफ इंडिया’ हे पुस्तक तयार झाले असून प्रकाशनाआधी वाचकांसाठी ते सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याच मानस बीएनएचएसने व्यक्त केला असून २२०० रुपये किमतीचे हे पुस्तक येत्या १५ जुलैपर्यंत वाचकांना १८०० रुपयात उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी www.bnhs.org या संकेतस्थळावर वाचकांना सोय करून देण्यात आली आहे.

फुलपाखरांसाठी मी भारतभर फिरलो नाही, तर त्यांनीच मला भारत दाखवला आहे. भारतातील सौंदर्य फुलपाखरांनी दाखवले म्हणूनच त्यांच्याशी माझी नाळ घट्ट जुळली आहे. आसाम, अरुणाचलमध्ये फुलपाखरांच्या सहवासात मी अधिक रमतो, पण फुलपाखरांचे अभ्यासक डॉ. विलास बर्डेकर यांच्या अपहरणानंतर थोडी खबरदारी घेऊनच राहतो. २०१० मध्ये अपघातामुळे काही काळ घरी बसावे लागले. त्याचा सदुपयोग पुस्तकाच्या लिखाणातून केला आणि घरात असूनही फुलपाखरांचा आसा सहवास लाभला.

-आयझ्ॉक किहीमकर

 

 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isaac kehimkar book butterfly man of india
First published on: 14-06-2016 at 03:04 IST