गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नागपुरात पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेली शहराची दैनावस्था बघता महापालिका प्रशासनाने यावर्षी नालेसफाई अभियानाला गती देण्यासोबतच  रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती , नाल्याच्या सुरक्षा भिंत उभारणे आदी सर्व कामे पावसाळ्याच्या पूर्वी करणे आवश्यक आहे.

अन्यथा पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास जनता रस्त्यावर येईल असा इशारा भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दिला असून यासंदर्भात आमदार  खोपडे यांनी महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. मानसूनपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक रस्त्याची दैनावस्था झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत.

हॉटमिक्स प्लांटच्या माध्यमातून शहरातील खड्डे दुरुस्त करून डागडूजीचे काम केले जाते. परंतु पावसाला जवळ येऊन ठेपला असताना देखील आतापर्यंत हॉटमिस्ट विभागाने सक्रियता दाखविली नाही. जनतेचा रोष फक्त जनप्रतीनिधीवर असतो. त्यामुळे शहरातील दहाही झोन अंतर्गत रस्त्याची दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे असेही खोपडे म्हणाले.

हेही वाचा >>>राष्ट्रीय डेंग्यू दिवस विशेष: राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; मृत्यू मात्र नियंत्रणात

गेल्या अनेक दिवसापासून नागनदी सफाई अभियान सुरु आहे, मात्र नुकत्याच झालेल्या  अवकाळी वादळी पावसामुळे या अभियानाची पोलउघड झाली आहे.  शहरातील छोटे-मोठे नाले व नागनदीचा गाळ काढून सफाई करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या सर्व झोन अंतर्गत व त्यावर एका संबंधित अधिकाऱ्याला जबाबदारी देऊन सफाई अभियानाची गती वाढविण्याची, तसेच जागोजागी ड्रेनेज सिस्टम दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. 

पूर्व नागपुरातील नंदनवन झोपडपट्टी, संघर्षनगर, शांतीनगर, हिवरीनगर व अनेक भागात नागनदी व नाल्याची सुरक्षा भिंत जागोजागी खचलेली असून नागरिकांनी अनेकदा निवेदन दिलेले आहे. याबाबत दरवर्षी तक्रारी जेल्या जातात मात्र प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येते. त्यामुळे नागनदीचे पाणी पावसाळ्यात लगतच्या वस्त्यात शिरून नागरिकांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे खचलेल्या सुरक्षा भिंतीची दुरुस्ती करावी किंवा तुटलेल्या भिंतीचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे.

हेही वाचा >>>मृत व्यक्ती, स्थलांतरितांची नावे मतदार यादीत, भाजपने दिले पुरावे

 वरील सर्व विषय अत्यंत तातडीचे व महत्वाचे असून प्रशासनाच्या बेजबाबदार कारवाईमुळे दरवर्षी पोल उघड होते. त्यामुळे यावर्षी तरी अशी दैनावस्था होऊ नये व संभावित धोका टाळण्याच्या दृष्टीने वेळीच कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्याचे खोपडे म्हणाले.