अंबाझरी-सहकारनगर घाट;  दहन ओटे तुटलेले, स्वच्छतेकडे दुर्लक्ष; सहकारनगर घाटावर सुविधांचा अभाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील स्मशानभूमी आणि तेथील आवश्यक सुविधा या बाबी इतर मूलभूत सुविधांइतक्याच महत्त्वाच्या आहेत. याची सर्वस्वी जबाबदारी ही महापालिकेची आहे. मात्र, केवळ भव्यदिव्य व महाप्रकल्पांच्या उभारणीत व्यस्त असलेल्या महापालिकेचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते, तेथील विसाव्याची जागा, लोकांना पिण्यासाठी पाणी, शोकसभेसाठी सभागृह, बसण्याची व्यवस्था, कर्मचाऱ्यांची सौजन्याची वागणूक आणि स्वच्छता आदी सुविधा या ठिकाणी अपेक्षित आहेत. याबाबत ‘लोकसत्ता’ चमूने पाहणी केली असता घाटांवरचे विदारक चित्र पुढे आले. त्याचा घेतलेला हा आढावा..

मृत्यूनंतरच्या मरण कळा

जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ असतो. जन्माचे स्वागत ज्या पद्धतीने केले जाते, तसाच त्याचा अंतिम प्रवाससुद्धा सुखाचा ठरावा, अशी अपेक्षा असते. मात्र, सहकारनगर आणि अंबाझरी स्मशानघाटावर गेल्यानंतर ही अंतिम यात्रा सुखाची ठरते का, असा प्रश्न पडतो. कारण वाहनातून घाटापर्यंतचा अंतिम प्रवास जेव्हा ‘विसाव्या’वर येऊन थांबतो तेव्हा ‘विसाव्या’पासूनचा ‘ओटय़ा’पर्यंतचा प्रवास पावसाळ्यात पाऊस अंगावर झेलत करावा लागतो. एवढेच नव्हे तर स्वच्छतेबाबत या दोन्ही घाटांची अवस्था अतिशय वाईट  आहे.

अंबाझरी घाटाचे प्रवेशद्वार मोडकळीस आले असून ते तारेने बांधलेले आहे. त्यामुळे सुमारे सहा महिन्यांपूर्वी या घाटावरचे संपुष्टात आलेले रात्रीचे गुंडांचे राज्य पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घाटावर रात्रीच्या वेळी गुंडाचाच निवास असायचा. एक सुरक्षारक्षक संपूर्ण घाटाकडे लक्ष देऊ शकत नाही. आतील दफनभूमीची अवस्थाही अतिशय वाईट आहे. हिंदू धर्मात लहान मुलांवर अग्निसंस्कार केले जात नाही, तर त्यांना जमिनीत दफन केले जाते. या ठिकाणी गवत वाढले आहे. घाटावर अंत्यसंस्कारासाठी ११ ओटे आहेत, ते ठिकठिकाणी तुटलेले आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने एक गोष्ट मात्र याठिकाणी चांगली आहे आणि ती म्हणजे याठिकाणी एलपीजी तसेच मोक्षकाष्ठवर होणाऱ्या अंतिम संस्कारात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे.

मोक्षकाष्ठ निकृष्ट दर्जाचे

एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून येथे सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कारासाठी मोक्षकाष्ठची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, ते नीट जळत नव्हते. त्यामुळे पर्यावरणपूरक असूनही मोक्षकाष्ठ वापरण्याचा आग्रह आम्ही सोडून दिला, असे सहकारनगर घाटावरील एका कर्मचाऱ्याने सांगितले.

पावसाळ्यात गैरसोय

या दोन्ही घाटांवर विसाव्यापासून तर ओटय़ापर्यंत ५० ते ६० मीटरचे अंतर आहे. उन्हाळा, हिवाळा ठीक, पण पावसाळ्यात अनेकदा पावसात भिजतच शव न्यावे लागते. लाकडांची व्यवस्थाही नीट नाही. अतिशय मोठमोठे लाकडाचे ओंडके या ठिकाणी आणून टाकलेले आहेत. अशावेळी लोकांनी आधी लाकडे फोडायची आणि मग अंत्यसंस्कार करायचा काय? कित्येक वर्षांपासून हे ओंडके तसेच पडलेले आहेत.

सहकारनगरची दुरवस्था

सहकारनगर घाट म्हणजे नरकाचा प्रवास असेच वर्णन करावे लागेल. या घाटाची सुरक्षा भिंत तुटलेली आहे. सर्वाधिक दुर्दशा कोणत्या घाटाची असेल तर सहकारनगर घाटाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या घाटावर चार ओटे आहेत व त्यावर एक ते दीड फूट खोल खड्डे आहेत. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी लोकवस्ती वाढली. मनीषनगर, प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर, देवनगर आदी परिसरातील शवयात्रा या घाटावरच येतात. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना प्रथम मोकाट कुत्र्यांच्या टोळीला तोंड द्यावे लागते. मागे प्रचंड मोठी झाडी वाढलेली असून सुरक्षेच्या दृष्टीने येथे काहीच व्यवस्था नाही. शोकसभेसाठी जागा सोडा, पण बसण्यासाठी येथे व्यवस्था नाही. विशेष म्हणजे, महापालिकेच्या कर्मचाऱ्याला सुद्धा बसण्यासाठी जागा नाही. स्वच्छतागृहाचा अभाव आणि पाण्याचे नळ नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारादरम्यान एक मोटार सुरू केली की नळ नसल्यामुळे त्यातून दिवसभर मग पाणी वाहते. घाटाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग आणि नाल्याची दुर्गंधी यामुळे अंतिम प्रवासही सुखावह होत नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of facility at crematoriums in nagpur
First published on: 21-11-2017 at 04:58 IST