शहरातील सर्व नवीन पोलीस ठाण्यांना स्वतच्या मालकीची जागा लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सरकारला प्राप्त झाला असून जागा लवकरच उपलब्ध केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पोलीस नियंत्रण कक्षाच्या डिसीआरएमएस-‘डायल १००’ या यंत्रणेचे उद्घाटन व गस्ती वाहनांना मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून आज शुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावळकुळे होते. प्रमुख अतिथी खासदार दर्डा, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त अनूपकुमार, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिव कुर्वे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
केवळ संख्याबळ वाढवून गुन्हे कमी होणार नाही, तर गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होणे आवश्यक आहे. नवीन पोलीस ठाण्यांना तातडीने जागा मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबतचे प्रस्ताव शासनाला प्राप्त झाले आहेत, असेही ते म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी रुपये ग्रामीण पोलिसांना व एक कोटी रुपये नागपूर शहर पोलिसांना नवीन पोलीस ठाणे उभारणी व नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहेत. नव्याने स्थापन झालेल्या पोलीस ठाण्यांसाठी नागपूर सुधार प्रन्यासने इमारतीची उभारणी तातडीने करून द्यावी, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शहरातील सर्व २४ पोलीस ठाण्यात प्रत्येकी चार याप्रमाणे गस्ती वाहने तैनात ठेवण्यात येणार आहेत. या वाहनांवर बसविलेली यंत्रणा संबंधित कर्मचारी बंद किंवा निकामी करू शकणार नाही, असे पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवटे, इसू सिद्धू यांनी केले. पोलीस सहआयुक्त राजवर्धन यांनी आभार मानले.
‘डीसीएमएस डायल १००’ काय आहे?
नियंत्रण कक्षाकडे ‘१००’ क्रमाकांच्या केवळ दहा लाईन्स होत्या. आता त्या दुप्पट करण्यात आल्या आहेत. ‘डायरेक्ट कॉल मॅनेजमेन्ट सिस्टम’ या अत्याधुनिक प्रणालीमुळे कॉल ड्रॉपचे प्रमाण शून्यावर येणार आहे. यंत्रणेला जोडलेल्या व्हिडिओ मॉनिटर सुविधेमुळे ‘१००’ क्रमांकावर येणारे कॉल आवश्यक तपशीलासह प्रदर्शित होणार आहेत. तक्रारकर्त्यांना लवकरात लवकर मदत मिळण्यास देखील मदत होणार आहे.