|| लोकजागर देवेंद्र गावंडे
विदर्भातील काँग्रेस पक्षाच्या घडामोडींकडे बारकाईने बघितले की या पक्षात तीन प्रकारच्या वृत्तींचे लोक ठळकपणे दिसून येतात. यातल्या पहिल्या वृत्तीच्या गटात मोडणारा सलगचे पराभव पचवू न शकलेला, किंबहुना विरोधात राहण्याची सवयच विसरून गेलेला नेता व कार्यकर्त्यांचा समूह गेल्या पाच वर्षांपासून भाजपमध्ये प्रवेश करत आहे. आजच्या निवडणुकीच्या वातावरणात या प्रवेशाला जरा जास्तच वेग आला आहे. पक्ष अडचणीत असताना अशी वृत्ती जोपासणारा हा वर्ग बरीच वर्षे निष्ठावंत म्हणून मिरवत होता. पक्षाच्या विचारसरणीचे जाहीर गोडवे गात होता. सोबतचे कार्यकर्ते त्याच्या निष्ठेचे कौतुक करताना थकत नव्हते. आता जहाज बुडायला लागताच या नेत्यांनी पळ काढणे सुरू केले आहे. या पक्षातील दुसऱ्या वृत्तीचा गट म्हणजे पक्षात राहायचे, पण प्रसंगी फायद्यासाठी विरोधकांशी संधान साधायचे, आक्रमक विरोधक अशी प्रतिमा निर्माण करून सत्ताधाऱ्यांकडून स्वत:चा फायदा करून घ्यायचा, अडचणीत असलेल्या पक्षाला जमेल तसे ‘ब्लॅकमेल’ करायचे व स्वार्थ साधून घेणाऱ्यांचा! संकटाच्या काळात स्वत:ची चांदी कशी करून घ्यायची ही सुद्धा एक कला आहे. दुसऱ्या गटात मोडणाऱ्या या नेत्यांनी ही कला चांगलीच अवगत केल्याचे गेल्या पाच वर्षांत वारंवार दिसून आले. तिसरी वृत्ती जोपासणाऱ्या नेत्यांची संख्या विदर्भात तशी कमी आहे, पण कार्यकर्ते भरपूर आहेत. पक्षाच्या विचाराशी प्रामाणिक असलेल्या नेते व कार्यकर्त्यांचा हा वर्ग आहे. या वर्गाला पक्षाची चिंता आहे. तशी ती ते बोलून दाखवतात. पण त्यांच्या हातात करण्यासारखे फारसे काही नाही.
परिणामी, पक्षात चुकीची कृती घडली की हळहळ व्यक्त करण्यात हा वर्ग समोर असतो. त्यामुळे पक्षातील इतर दोन वृत्तींच्या तुलनेत या तिसऱ्यांची ताकद व आवाज जरा कमी आहे. खरे तर आजच्या कठीण काळातही ही तिसरी वृत्ती जपणारा हा वर्गच पक्षाचे आशास्थान ठरू शकतो. मात्र, पक्षश्रेष्ठीकडे तशी दूरदृष्टी दिसत नाही. आता जरा पहिल्या वर्गाविषयी. २०१४च्या लोकसभेतील मोठी लाट अनुभवल्याबरोबर हे संधीसाधू नेते सत्ताधाऱ्यांच्या कळपात पळायला सुरुवात झाली. राज्याच्या तुलनेत विदर्भात हे पक्षांतराचे प्रमाण कमी होते, कारण भाजपची विदर्भातील संघटनात्मक शक्ती तगडी होती व आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांनी या वैदर्भीय संधीसाधूंकडे फार लक्ष दिले नाही. आता दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना यापैकी अनेकांना संधी मिळत आहे. कारण एकच. यातून तयार होणाऱ्या वातावरणाचा फायदा सत्ताधाऱ्यांना उठवायचा आहे. या अशा पक्षांतरामुळे विरोधातील मुद्दे आपसूकच मागे पडतात याची जाणीव सत्ताधाऱ्यांना आहे. दुसरीकडे हे सत्तेच्या कळपात जाणारे काँग्रेसचे नेते विकासासाठी हे करावे लागत असल्याचा जाहीर आव आणत असले तरी त्यात अजिबात तथ्य नाही.
वर्षांनुवर्षे काँग्रेससोबत व सत्तेत राहून या नेत्यांनी त्यांच्या क्षेत्राचा किती विकास केला, या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेले की या नेत्यांचा खोटारडेपणा सहज उघड होतो. आजकाल विकासाची नवी व्याख्या राजकारणात चलनात आली आहे. जनतेसोबत स्वत:चाही विकास साधून घेणे असे त्याचे स्वरूप. या पक्षांतरबाज नेत्यांच्या क्षेत्राकडे बघितले तर त्यांनी स्वत:चाच विकास जास्त साधून घेतल्याचे सहज लक्षात येते. परिणामी, दलबदलू भूमिकेला तात्त्विक मुलामा देण्याचा या नेत्यांचा प्रयत्न पचनी पडत नाही. पक्षाने अन्याय केला अशीही टूम यासाठी काहीजण वापरतात. नेमका अडचणीच्या काळातच या नेत्यांना अन्याय कसा काय आठवतो हे कुणालाच कळत नाही. पक्षात राहूनच स्वत:चे मतलब साध्य करून घेणाऱ्या दुसऱ्या वृत्तीचे नेते व कार्यकर्ते सध्या पक्षाची अंतर्गत डोकेदुखी ठरले आहेत. विशेष म्हणजे, पक्षश्रेष्ठी मात्र याला डोकेदुखी मानत नाही. हा वर्ग स्वहितासाठी कोणत्याही थराला जातो, फक्त पक्ष तेवढा सोडत नाही. सत्ताधाऱ्यांना सुद्धा हे मतलबी राजकारण चांगले कळते. तरीही ते या वर्गाला सतत गोंजारत राहतात व निवडणुकीच्या वेळी हवा तो प्रतिस्पर्धी पदरात पाडून घेतात.
गेल्या पाच वर्षांचा काळ आठवून बघा. हा मतलबी वर्ग अनेक प्रकरणात, राजकीय भूमिका घेतेवेळी, निवडणुकांच्या काळात सत्ताधाऱ्यांशी पडद्याआडून हातमिळवणी करताना आढळून आला. कधी गटबाजीचे कारण समोर करत तर कधी स्वत:च्या व्यवसायाचे हित जोपासण्यासाठी तर कधी निव्वळ आर्थिक हेतूने ही तडजोड सुरू राहिली. पक्षात मानाची पदे भूषवणारे जिल्हा पातळीवरचे अनेक नेते या काळात आडून आडून सत्ताधाऱ्यांचा पाहुणचार झोडत राहिले. पक्षाच्या केंद्रीय कार्य समितीत असलेल्या नेत्यांच्या दिमतीला सत्ताधाऱ्यांची वाहने उभी राहात असल्याचे अनेकांनी अनुभवले. कुणी सहकार तर कुणी शिक्षण क्षेत्राच्या नावावर सरकारकडून लाभ पदरात पाडून घेतले. गटबाजी हा काँग्रेसला जडलेला असाध्य रोग आहे. त्याचा फायदा घेत स्वपक्षीयांचा घात करून सत्ताधाऱ्यांना फायदा पोहचवण्याचे काम या वर्गातील नेते करीत राहिले व दुसरीकडे पक्षाचे निष्ठावान म्हणून मिरवत सुद्धा राहिले. पक्षाला ब्लॅकमेल करून हवे ते पदरात पाडून घेण्याचा उद्योग सुद्धा याच वर्गातील नेते करत राहिले. कधी पत्नीला तर कधी गणगोतांना उमेदवारी हवीच, अन्यथा चाललो पक्ष सोडून अशी भाषा या काळात सतत ऐकायला मिळाली. अडचणीच्या काळात बाहेरच्या धनिकांना पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यात हाच वर्ग आघाडीवर होता. काहीही बोलण्याच्या वा हरकत घेण्याच्या मन:स्थितीत नसलेला पक्ष हे नेते सांगतील तसे ऐकत राहिला. आता दिवस फिरले आहे अशी स्वत:ची समजूत करून घेत राहिला. संधी मिळाल्यास हा मतलबी नेत्यांचा वर्ग सुद्धा पक्ष सोडून जाऊ शकतो, याची जाणीव श्रेष्ठींना असूनही ते या नेत्यांच्या आग्रहाला बळी पडत राहिले.
आता तिसऱ्या वृत्तीच्या वर्गाविषयी. काहीही झाले तरी पक्ष टिकला पाहिजे. विचार जिवंत राहायला हवा असे मानणाऱ्या या वर्गातील बहुतांश नेते तरुण असून संधीच्या प्रतीक्षेत आहेत. दुर्दैवाने पराभवाच्या छायेत सहा वर्षे काढून सुद्धा या वर्गाकडे पक्षाने अजूनही म्हणावे तसे लक्ष दिले नाही. पक्षासाठी काहीतरी करण्यासाठी हात शिवशिवत असलेल्या या वर्गावर आधीच्या दोन वृत्तींच्या नेत्यांचे पक्ष बुडवणारे राजकारण मूकपणे बघण्याची वेळ आली आहे. या वर्गातील कार्यकर्त्यांची गत सुद्धा तशीच आहे. आम्हाला विचारतो कोण, हाच त्यांचा प्रश्न आहे. लढण्याची वृत्तीच गमावून बसलेल्या काँग्रेसमधील प्रयोगशीलता सुद्धा संपली आहे, हे या वर्गाकडे बघून स्पष्टपणे जाणवते. निवडणुकीचे निकाल काहीही लागोत, पण विदर्भातून वेगाने होणारे हे काँग्रेसचे अध:पतन चिंताजनक आहे.- devendra.gawande @expressindia.com