देवेंद्र गावंडे

कुजबूज, कुचाळक्या हा मानवी स्वभावगुण. दोघांच्या बोलण्यात हजर नसलेल्या तिसऱ्याचा विषय येतो तेव्हा तो आणखी बहरतो. मी कुणाविषयी त्याच्या माघारी कधी बोलत नाही असा दावा करणारे लोक संधी मिळाली की बोलतातच. तोंडावर बोलण्याचे धारिष्ट्य नसलेले लोक पाठीमागे अधिक खुलून व स्पष्टपणे बोलतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा गुण अधिक यातही तथ्य नाही. पुरुष सुद्धा मिळालेली संधी कधी सोडत नाहीत. ही कुजबूज अथवा कुचाळकी कुणाच्या भल्यासाठी होत असेल तर ती क्षम्यही म्हणता येईल पण या माध्यमातून कुणाची बदनामी केली जात असेल तर ते गैरच. याच कुजबुजीतील चर्चांना जेव्हा जाहीर स्वरूप प्राप्त होते तेव्हा ते समाजस्वास्थ बिघडवणारे ठरते. विशेषत: एखाद्याच्या चारित्र्यावरून ती होत असेल तर. सार्वजनिक जीवनात वावरताना सभ्यतेच्या मर्यादा सर्वांनीच पाळाव्यात अशी अपेक्षा असते. त्याचा भंग करत जाहीरपणे एखाद्याचे चारित्र्यहनन करणे असभ्यपणाच. अलीकडे तो कमालीचा वाढलाय.

समाजमाध्यम नावाचा प्रकार नावारूपाला आल्यावर तर याला काही धरबंदच उरला नाही. कुणीही समोर येतो व कुणाचेही कपडे फाडतो, आरोपांचा चिखल निर्माण करतो. संबंधितांना याचा किती त्रास सहन करावा लागतो याची जाणीवही आजकाल कमी होत चाललेली. किमान निवडणुकीच्या काळात तरी असे शिंतोडे उडवले जाऊ नयेत अशी साऱ्यांची अपेक्षा. लोकशाहीतला हा उत्सव सभ्यतेची मर्यादा पाळूनच साजरा व्हायला हवा याकडे पूर्वी कटाक्षाने लक्ष दिले जायचे. आता त्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय वाढलेली. निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांवर टीका करायची संधी मिळते म्हणून काहीही बोलायचे, खालची पातळी गाठायची, चारित्र्याचे मुद्दे सार्वजनिक व्यासपीठावर आणायचे हे तोल ढळण्याचेच लक्षण. त्याचा अनुभव सध्या विदर्भात सर्वत्र येतोय. भंडारा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज झालेले माजी आमदार सेवक वाघाये बंडखोरी करून रिंगणात आहेत. त्यांचे व नाना पटोलेंचे पटत नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला इथवर ठीक पण गेल्या शुक्रवारी त्यांनी भर पत्रपरिषदेत पटोलेंबद्दल जी भाषा वापरली ती ऐकून अथवा त्याची चित्रफीत बघून कुणाचीही मान शरमेने खाली जावी. गेली अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात वावरणारा माणूस इतकी गलिच्छ भाषा कशी काय वापरू शकतो? यालाच काँग्रेसची संस्कृती म्हणायचे काय? व्यक्तिगत जीवनात पटोले काय करतात व काय नाही हा त्यांचा व फार तर त्यांच्या कुटुंबाशी निगडित प्रश्न. त्यात इतरांनी नाक खुपसण्याचे काही कारण नाही. तरीही त्यांच्यावरच्या रागाला मोकळी वाट करून देताना वाघायेंनी असे दाखले द्यावेत हे कुणालाही न आवडणारे. अशा पद्धतीने विरोधकांचे चारित्र्यहनन केले म्हणजे मते मिळतील, महिलावर्ग आनंदाने ते स्वीकारेल असे वाघायेंना वाटते काय? तसे असेल ते मूर्खाच्या नंदनवनात वावरताहेत असेच म्हणावे लागते.

याच मतदारसंघात भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी सभा घेतल्या. त्यांनीही पटोलेंना उद्देशून एक घाणेरडा शब्द वापरला. चारित्र्याचे प्रमाणपत्र वाटण्याचे कंत्राट आपल्यालाच मिळाले अशा अविर्भावात त्या कायम वावरतात. त्याचेच दर्शन त्यांच्या भाषणातून घडले. दुसऱ्याकडे बोट दाखवताना ते आपल्याकडेही वळू शकते याचे भान आजकाल हरवत चाललेले. एखाद्याच्या चारित्र्यावर बोलले म्हणजे त्याची बदनामी होईल व लोक मत देणार नाही अशा फाजील आत्मविश्वासातून अशी वक्तव्ये समोर येतात. प्रत्यक्षात मतदार या चिखलफेकीला फार महत्त्व देत नाही. अतिशय जबाबदारीने तो त्याचे मत कुणाला हे ठरवतो. मागील लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमध्ये दारूवाला की दूधवाला असा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला गेला. दारू ही वाईट. त्यामुळे महिला व मोठ्या प्रमाणातील निर्व्यसनी वर्ग आपल्या बाजूने झुकेल असा वाद निर्माण करणाऱ्यांचा अंदाज होता. तो फोल ठरला. दूधवाल्याच्या कामगिरीलाच लोक कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी या वादाकडे दुर्लक्ष करत दारूवाल्याला निवडून दिले. यंदा तर याच मतदारसंघात अतिशय घाणेरड्या पद्धतीने बदनामीची मोहीम राबवली गेली. त्यात एका उमेदवाराच्या कुटुंबाला ओढण्याचा प्रयत्न झाला. हे कृत्य करणाऱ्या सुपारीबाज पत्रकाराला गजाआड व्हावे लागले. मुळात असे आरोप करून निवडणूक जिंकता येत नाही. मतदार असल्या भाकडकथांवर फार विश्वास ठेवत नाहीत. पक्षाची भूमिका, त्याचे नेतृत्व, त्यांनी मांडलेला विचार, त्यांच्याकडून झालेली कामे, सोडवलेल्या समस्या, विरोधकांकडून दिली जाणारी आश्वासने, उमेदवार म्हणून कोण योग्य यावर मत ठरवतो. याशिवाय काही ठिकाणी जातीचा आधार असतोच. तोही एकदाचा क्षम्य समजता येईल. या वस्तुस्थितीची जाणीव असून सुद्धा बदनामीचे प्रयत्न वाढत चालले ही धोक्याची घंटा.

वर्धा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले रामदास तडस यांनाही अशाच त्रासाला सामोरे जावे लागले. त्यांच्या मुलाच्या लग्नाचा विषय चव्हाट्यावर आणण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे खास नागपूरला आल्या. त्यांनी तडस यांच्या सुनेला समोर करून आरोप करण्याची हौस भागवून घेतली. तडसांच्या मुलाने या मुलीवर अन्याय केला असेलही. हा वैयक्तिक व न्यायालयीन वादाचा विषय. मात्र तो निवडणुकीच्या निमित्ताने समोर आणून विरोधकांना नेमके साधायचे काय? तर केवळ बदनामी. राजकारणाची पातळी किती घसरली हेच यातून दिसले. अशी बदनामी करून वा निवडणुकीला उभे राहून न्याय मिळत नाही. थोडीफार सहानुभूती मिळते हे माहिती असून सुद्धा असे प्रकार केले जात असतील तर ते चुकीचेच. याच अंधारेंना मध्यंतरी वैयक्तिक बदनामीला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या कुटुंबात असलेला वाद भाजपने समोर आणला होता. तेव्हा समाजातला मोठा वर्ग अंधारेंच्या बाजूने उभा ठाकलेला. जे घडतेय ते योग्य नाही असे याच अंधारेंचे म्हणणे होते. आता त्यांना याचे विस्मरण झाले असे समजायचे काय? राजकारणात जे जे सोयीचे असेल ते करायचे ही पूर्वापार चालत आलेली पद्धत. या सोयीच्या यादीत आता चारित्र्यहनन व बदनामी हे शब्द सुद्धा चपखलपणे जाऊन बसलेत. एकीकडे समाज प्रगत होत चालला असे म्हणायचे व दुसरीकडे वर्तन मात्र अधोगतीकडे नेणारे करायचे. यात कसला आला शहाणपणा? दुर्दैव हे की आजकाल हाच गढूळपणा वाढत चाललाय. कसलेही नियंत्रण नसलेली समाजमाध्यमे यासाठी हत्यार म्हणून वापरली जाऊ लागलीत. त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरायचे कसे असा प्रश्न अनेकांना पडू लागलाय. आजकाल राजकारणातल्या अनेकांनी मन घट्ट करून या बदनामीकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. हे योग्य असले तरी असले प्रकार थांबायला हवेत यावर कुणीही गंभीरपणे विचार करत नाही. वैचारिक दारिद्र्याचा अभाव सर्वत्र आढळणे हे प्रगतीचे लक्षण कसे समजायचे? एकूणच विचारशून्यतेकडे नेणारा हा प्रवास आता धोकादायक वळणावर येऊन ठेपलाय.

devendra.gawande@expressindia.com