माथेफिरू प्रियकराच्या हल्ल्यातील तरुणीचा अखेर मृत्यू

कधीकाळी ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला तोच जीवावर उठला..विसंवाद, मतभेद थेट भांडणापर्यंत पोहोचले..एका बेसावध क्षणी ती पाठमोरी वळली आणि तिच्या नकाराने संतापलेल्या त्याने धारदार चाकूने तिच्या शरीराची चाळण करून टाकली..पण, तिची जगण्याची उमेद प्रचंड होती..जखमी शरीरासह तिने तब्बल अडीच महिने मृत्यूशी प्रखर झुंज दिली..परंतु अखेर अपयशी ठरली. आज गुरुवारी सानिका ऊर्फ टिनू प्रमोद थुगावकर (१९) हिने उपचारादरम्यान प्राण सोडला. रोहित मनोहर हेमलानी (२१) रा. सिंधी कॉलनी, खामला याने प्रेमसंबंधातून सानिकावर प्राणघातक हल्ला केला होता. तो सध्या मध्यवर्ती कारागृहात असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचे कलम वाढवले आहे.

सानिका सोमलवार महाविद्यालयात टेक्सटाईल पदविका अभ्यासक्रमाला शिकत होती. महाविद्यालय परिसरातील  एका मोबाईल दुकानात आरोपी काम करायचा. दोघांची मैत्री व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, ३ एप्रिलपासून तरुणीने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले.  त्यामुळे तो संतापला होता. १ जुलैला रात्री सानिका आपले मामा अविनाश पाटणे यांच्या लक्ष्मीनगरातील सरस्वती अपार्टमेंटमधील वित्त पुरवठा कंपनीच्या कार्यालयात गेली होती. आरोपी तिथे पोहोचला. त्याने शेवटची चर्चा करण्यासाठी तिला बाहेर बोलावले. ती मामासमोरच बोलत होती. दोघांचेही बोलणे झाल्यानंतर मामाने तिला आत जाण्यास सांगितले. ती पाठमोरी होताच आरोपीने चाकूने तिच्यावर हल्ला केला. तिचे खांदे, छाती व पोटावर गंभीर दुखापत झाली. आरोपी पळून गेला. मामाने तिला रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या आतडय़ा कापल्या गेल्या. डॉक्टरांनी त्या जोडल्या. उपचाराला ती सकारात्मक प्रतिसाद देत होती. कालांतराने तिला अन्न खायला देऊ लागले. मात्र, अन्न पोटापर्यंत जात नसल्याचे दिसून आल्यानंतर अनेक शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली. त्या शस्त्रक्रिया करताना तिची प्रकृती खालावत गेली व अखेर आज दुपारी तिचा मृत्यू झाला.

आजी-आजोबांनी सांभाळ केला

सानिकाचे आईवडील पांडे लेआऊट परिसरात राहतात. वडील फोटोग्राफर असून त्यांचे प्रतापनगर परिसरात दुकान आहे. मात्र, सानिका बालपणापासून आजी-आजोबा व मामाकडे लक्ष्मीनगर परिसरात राहात होती. मामाकडे राहूनच तिचे शिक्षण पूर्ण झाले. या घटनेने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

उपचारासाठी अनेकांनी मदत केली

सानिकावर अनेक शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली. आईवडील व मामा यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे सहयोग ट्रस्टच्या वतीने अ‍ॅड. स्मिता सिंगलकर यांनी आर्थिक सहकार्यासाठी लोकांना आवाहन केले. सानिका वाचावी यासाठी अनेक नागरिकांनी आर्थिक मदत  केली, परंतु काळापुढे सर्वाचीच धडपड निष्फळ ठरली.