देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : उच्च शिक्षणात मुलींच्या गुणवत्तेची टक्केवारी वाढत असली तरी मुळातच शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या मुलींची टक्केवारी कमी होत होत आहे. बारावीच्या निकालाच्या आकडेवारीवरून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.२९ टक्के तर मुलींचे प्रमाण ९५.३५ टक्के आहे. पण, राज्यात बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या १ लाख ३३ हजार १७९ एवढी कमी आहे. यंदा राज्यभरातून बारावीच्या परीक्षेला ७ लाख ८६ हजार ४५५ मुलांनी तर केवळ ६ लाख ५३ हजार २७६ मुलींनी नोंदणी केली होती. हे चित्र केवळ या एकाच वर्षांचे नाही. दरवर्षी मुलींच्या प्रवेशाचा टक्का घसरत चालल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०२१ मध्ये ७ लाख १० हजार मुलांनी तर ६ लाख ९ हजार मुलींनी नोंदणी केली होती. ही घट १ लाख १ हजार इतकी असून यंदा पुन्हा ३२ हजारांनी मुलींची संख्या घटली आहे. या निकालाच्या मागचे वास्तव समाजाला आत्मचिंतन करायला लावणारे आहे.