नागपूर : गेल्या चार वर्षांत अनेक राष्ट्रीय संस्थांचे जाळे नागपुरात फुलले. वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी शिक्षणानिमित्त उपराजधानीत दाखल  झाले. त्यांना  रोजगारही मिळाला.   मुंबई पुण्याच्या लोकप्रतिनिधींनी सर्व काही नागपुरातच! अशी टीका फडणवीस सरकारवर केली. औषधनिर्माण क्षेत्रातील नायपर ही संस्था वगळता बाकी सर्व संस्था नागपुरात सुरू झाल्या आहेत. त्यात अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय, व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान अशा सर्वच प्रकारच्या राष्ट्रीय वा राज्य स्तरीय  एकूण सहा राष्ट्रीय वा राज्यस्तरीय संस्था नागपुरात एकवटल्या आहेत. शिवाय सिम्बॉयोसिस सारखे खासगी विद्यापीठ त्यात ट्रीपल आयटी, आयआयएम, एनएलयू, जीसीओई, एआयआयएम आणि नायपर या संस्थांव्यतिरिक्त ४५० एकरवर सिम्बॉयसीसचे काम वाठोडा भागात सुरू आहे.

नागपुरात लक्ष्मीनारायण तंत्रशास्त्र संस्था (एलआयटी) आणि व्हीएनआयटी या दोन बिनीच्या संस्था सोडल्या तर चार वर्षांपूर्वी नागपुरात राष्ट्रीय संस्थांची वानवाच होती. आता मात्र, त्यात भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (ट्रीपल आयटी), भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), राष्ट्रीय विधि विद्यापीठाची (एनएलयू) भर पडली. एवढेच नव्हे तर त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्वत:चे किंवा तात्पुरते परिसर निर्माण होऊन काहींच्या एकेक बॅचही संस्थेच्या बाहेर पडल्या आहेत. आयआयएमची सुरुवात २०१५मध्ये झाली. सध्या ते व्हीएनआयटी परिसरात सुरू आहे.  संस्थेच्या पहिल्या बॅचचा पदवीप्रदान समारंभ यावर्षी झाला. आश्चर्य म्हणजे, आख्ख्या तुकडीचे  प्लेसमेंट करणारी आयआयएम ही पहिलीच संस्था ठरली आहे. अर्थात संस्थेत मर्यादित विद्यार्थी असल्याने ते शक्य झाले.

विभागात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय केवळ चंद्रपूर जिल्ह्य़ात होते. गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीनंतर नागपुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची (जीसीओई) घोषणा होऊनही अनेक वर्षे ते आलेच नाही. भाजप सरकारच्या काळात हे महाविद्यालय सुरू झाले हे विशेष. एनएलयू वर्धा मार्गावरील खापरी जवळच्या मिहान फ्लायओव्हर येथे स्थायिक झाले आहे. तर ट्रिपल आयटी सेमिनरी हिल्स वरील  रिजिनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर परिसरात सुरू आहे.

नायपरची प्रतीक्षा

नायपर ही एकमेव संस्था नागपुरात स्थापन होऊ शकलेली नाही. तिची घोषणा होऊन दोन-अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, ती अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (नायपर) गेल्यावर्षी केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयाच्या चमूने तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाने निवडलेल्या जागेला भेट दिली. मात्र चमूला ती जागा पसंत पडली नाही. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी कलाडोंगरी जवळची जागा चमूला दाखवली व पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्याने प्रस्ताव राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवला. त्यानंतर पुढे काही झाले नाही.

idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?

Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!

wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?