संयुक्त महाराष्ट्रवाद्यांवर वैद्यांचे शरसंधान
विदर्भ राज्य निर्मितीचा मराठी अस्मितेशी संबंध नाही, पण काही लोक हा मुद्दा उपस्थित करून विदर्भाच्या मागणीला बगल देण्याचे काम करत आहे, असे शरसंधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्यांवर केले. पत्रकार संघाने बुधवारी त्यांच्याशी वार्तालाप आयोजित केला होता. यावेळी त्यांनी विदर्भासह महाराष्ट्राचे चार राज्ये करण्याच्या त्यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला.
मराठी भाषकांचे दोन तुकडे होऊ देणार नाही, अशी भावनिक साद घालणाऱ्यांना उत्तर देत वैद्य म्हणाले, विदर्भ हे महाराष्ट्रात खुशीने सहभागी झालेले नाही. त्यामुळे वैदर्भीयांची नाराजी दूर करण्याच्या हेतूने ‘अकोला करार’ करण्यात आला. तुम्हाला काहीतरी अधिकचे देतो, पण आमच्यासोबत राहा, असे म्हणण्याचा हा प्रकार आहे. एका भाषेची एकाहून अधिक राज्य करण्यासाठी अस्मिता आड येऊ नये. या संदर्भात ते म्हणाले, आंध्र प्रदेशची दोन राज्ये झाले. त्यामुळे तेलगू भाषकांच्या अस्मितेचा काही प्रश्न निर्माण झाला नाही. अशाच प्रकारे मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशची दोन राज्ये झाली. तेथील हिंदी भाषकांची अस्मिता दुखावली गेली नाही. संबंधित दोन्ही राज्यांमध्ये रोटीबेटी व्यवहार आधी होते तसेच सुरू आहेत. तेव्हा विदर्भ वेगळा झाल्याने असे काही होईल, असे म्हणणे गैरलागू आहे. विदर्भ स्वतंत्र होऊन हिंदुस्तानाच राहणार आहे, पाकिस्तानात जाणार नाही. भाषावर झालेली प्रांतरचना, राज्य व्यवस्था चालवण्यास सोईची असली पाहिजे. राज्य व्यवस्थेने जनभावना लक्षात घेऊन राज्य निर्मिती करायला हवी. उत्तर प्रदेशची लोकसंख्या २० कोटी आहे. त्या राज्याचे ६ राज्यांमध्ये विभाजन झाले पाहिजे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संघमुक्त भारत या घोषणेवर वैद्य यांनी टीका केली. भारत संघमुक्त होऊ शकत नाही. जेव्हा-जेव्हा संघावर बंदी घालण्यात आली तेव्हा-तेव्हा संघ बळकट झाला आहे, असेही ते म्हणाले.