आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप

नागपूर : ठाकरे सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत वेळकाढूपणा केल्याने या आरक्षण वाटोळे झाले आहे. असाच प्रकार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांना लागू करण्याससंदर्भात सरकार करत आहे, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत  ठाकरे सरकाने ज्या पद्धतीने फक्त तारखावर तारखा मागितल्या आणि नाईलाजास्तव यांच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयाला ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द करावे लागले. आज तोच नाकर्तेपणा करत जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॉरीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकाराचे वाटोळे करायला हे ठाकरे सरकार निघालेले आहे.

केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. पण पाच वेळा उच्च न्यायालयाने तंबी देऊनही ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार टाळाटाळ करत आहे. शेवटी उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेत राज्याचे मुख्य सचिव यांना या योजनेवर निर्णय घेत कोर्टात हजर राहायला सांगितले आहे. सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचे सरकार गेंडय़ाची कातडी पांघरून बसले आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही, अशी टीकाही पडळकर यांनी केली.