पावसाळी अधिवेशनात मोर्चाद्वारे लक्ष वेधणार

उपराजधानित विकासकामांचा धडाका सुरू आहे, परंतु या विकासकामांचा फटका सीताबर्डी परिसरातील जुन्या पुस्तकांच्या व्यवसायाला बसत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ७ जुलैला नागपूर पुस्तके विक्रेता कल्याणकारी संघाच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या पण आर्थिक चणचणीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकणाऱ्या एक दोन नव्हे तर अनेक पिढय़ांनी याच जुन्या पुस्तकांवर आपले शिक्षण पूर्ण करून आयुष्य घडवले. मात्र, या व्यवसायाचेच आयुष्य धोक्यात आले आहे. बर्डी टी पॉईंटवर, जुन्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या बाजूला ही जुन्या पुस्तकांची दुकाने लावली जायची. येथे अभ्यासक्रमांबरोबरच अनेक दुर्मिळ पुस्तके, कथा कादंबऱ्याही विकल्या जायच्या. त्यामुळे इतरत्र पुस्तके मिळाले नाहीत तर जुन्या पुस्तकांच्या बाजारांचा पत्ता दुकानदारच सांगत. मात्र, या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे काम सुरू झाले आणि ही दुकाने हटवण्यात आली.

नवीन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थेने केली आहे. ही दुकाने येथून हटवण्यात आल्याने विशेषत: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय अभियांत्रिकी,वैद्यकीय, लॉ, एमबीए आणि पारंपरिक विद्याशाखांची पुस्तकेही आता मिळणे बंद झाल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाडली आहे.

२०१२मध्ये हिवाळी अधिवेशनात आमदार जोगेंद्र कवाडे यांनी विधान परिषदेत या समस्येवर प्रश्न उपस्थित केला होता. पुस्तक विक्रेत्या संघानेही मोर्चा काढून समस्येची तीव्रता शासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र, शासनाने त्यांची दखल घेतली नाही.

गेल्या आठ दशकांहून अधिक काळापासून मॉरिस कॉलेज टी पॉईंट परिसरात जुन्या पुस्तकांची विक्री करून आम्ही कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. शिक्षणप्रेमी, वाचक यांना दुर्मिळ पुस्तके उपलब्ध करून देणाऱ्या आमच्या व व्यवसायाने अनेकांना वाचनानंद दिला आहे. प्रशासनाच्या प्रतिनिधींनीही आमच्या या व्यवसायाच्या उपयुक्ततेबद्दल प्रशंसोद्गार काढले आहेत, परंतु आता विकास कामाच्या वरवंटय़ाखाली आमचा व्यवसाय पार धुळीस मिळाला असून महापालिकेच्या शासन व प्रशासनाने स्थायी स्वरूपाची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची मागणी आहे.

नरेश वाहणे, अध्यक्ष, नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था