लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर कल्पना प्रकाश पांडे (५३) आणि त्यांची बहीण भारती राजेंद्र पांडे (४९) यांना ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली. ‘एसीबी’च्या या कारवाईने राजकीय पुढाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, हा समाजातील गैरसमज मोडीत काढला.
१९९९-२००० या काळात कल्पना पांडे नागपूरच्या महापौर होत्या. आता त्या व्हीएमव्ही महाविद्यालयात सहाय्यक शिक्षिका असून छन्नुलाल नवीन विद्याभवन टीचर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आहेत. तर त्यांची बहीण भारती या संस्थेद्वारा संचालित गांधीबाग येथील छन्नुलाल नवीन विद्याभवन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत. या संस्थेत असणारी एक शिक्षिका दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाली. त्यानंतर शिक्षिकेने संस्थेकडे निवृत्तवेतनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्ज केला. त्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी कल्पना पांडे आणि तिच्या बहिणीने पन्नास हजारांची मागणी केली. त्यानंतर शिक्षिकेने ‘एसीबी’ कार्यालयात तक्रार केली.
एसीबी’ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी १० सप्टेंबर २०१५ आणि ६ ऑक्टोबर २०१५ रोजी पंचासमक्ष शहानिशा केली. त्यासंदर्भात रेकॉर्डिग वॉईस क्वॉलिटीकरिता पाठविण्यात आले.
या दरम्यान त्यांनी पैसे स्वीकारण्यासंदर्भात कोणतीही हालचाल न केल्यामुळे पोलिसांनी बुधवारी सकाळी ६.३० वाजता पुराव्यांच्या आधारांवर तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. गुन्हा नोंदविताच ‘एसीबी’च्या दोन वेगवेगळया चमुंनी कल्पना पांडे यांच्या हनुमाननगर येथील गाळ्यावर आणि भारती पांडे यांच्या विश्वकर्मा येथील घरावर छापे टाकले.
आज दिवसभर त्यांच्या घराची झाडाझडती सुरू होती. या छाप्यांत त्यांच्या घरांमधून काहीही आक्षेपार्ह सापडले नसल्याची माहिती आहे.
भाजपचे नेते पाठीशी
भारतीय जनता पक्ष कल्पना पांडे यांच्या पाठीशी असून शहर भाजपचे अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, भाजपचे प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, प्रमोद पेंडके, नगरसेवक छोटू भोयर, भाजप महिला सेलच्या नागपूर शहर अध्यक्षा कीर्तीदा अजमेरा, संजय फांजे आणि अनेक भाजप नेते जिल्हा व सत्र न्यायालयात उपस्थित होते.
नागपुरातील एका केंद्रीय मंत्र्यांच्या निर्देशावरून स्थानिक आमदारांनी पांडे यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केल्याची माहिती राजकीय वर्तुळातून येत आहे.

महाविद्यालयातून घेतले ताब्यात
बुधवारी सकाळी कल्पना पांडे या व्हीएमव्ही महाविद्यालयात शिकविण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ‘एसीबी’चे एक पथक व्हीएमव्ही महाविद्यालयात गेले आणि सकाळी ७.३० वाजता त्यांना ताब्यात घेतले आणि थेट सिव्हील लाईन्स येथील ‘एसीबी’च्या अधीक्षक कार्यालयात आणले. तर त्यांची बहीण भारती पांडे यांना त्यांच्या घरातूनच अटक करण्यात आली. दोघीही बहिणींना विशेष सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. एसीबीने दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. बचाव पक्षाने पोलीस कोठडी देण्यास विरोध केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.

पोलिसांवर राजकीय दबाव
कल्पना पांडे यांच्याविरुद्ध कारवाई केल्यामुळे ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव येत आहे. यासंदर्भात ‘एसबी’च्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला असून कोणाचेही नाव घेण्यास नकार दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.