दीड एकर जमीन बळकावल्याची एसआयटीकडे तक्रार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणात फरार असलेले अ‍ॅड. सतीश उके हे आता एका भूखंड घोटाळ्यातही अडचणीत आले असून त्यांनी दीड एकर जमीन बळकावल्याची तक्रार एका गृहनिर्माण संस्थेने विशेष तपास पथकाकडे केली आहे. लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेत उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर विविध आरोप करून अ‍ॅड. सतीश उके चांगलेच अडचणीत सापडले. त्यांच्याविरुद्ध फौजदारी अवमान खटला चालविण्यात आला. न्यायालयाने त्यांना २ महिन्यांची शिक्षा ठोठावली. सध्या उके फरार असून काल बुधवारी उच्च न्यायालयाने त्यांच्या मालकीची दाभा येथील ३ एकर शेती जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पोलीस सतत उकेंच्या मागावर  आहेत. कोणत्याही ठिकाणाहून त्यांना दिलासा मिळत नसून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. आता त्यांनी दीड एकर जमीन बळकावली व त्यावर भूखंड पाडून त्याची विक्री केल्याचा आरोप होत आहे.

मौजा बाबुळखेडा अंतर्गत बेसा मार्गावरील खसरा क्रमांक ८२/२ येथे विठ्ठल शंकरराव ढवळे आणि त्यांच्या बहिणीची दीड एकर (०.६१ हेक्टर आर) जमीन होती. २९ नोव्हेंबर १९९० ला त्यांनी ती जमीन ऐश्वर्या गृहनिर्माण सहकारी संस्थेला विकली. या संस्थेने संस्थेच्या सभासदांची संख्या लक्षात घेऊन या दीड एकरसह त्याच खसऱ्यातील एकूण ४.७५ एकर जमीन खरेदी केली. त्या ठिकाणी ७८ भूखंड पाडले आणि त्यांची विक्री संस्थेच्या सभासदांना केली. २००१ मध्ये उके यांनी विठ्ठल ढवळे व चंद्रशेखर नामदेवराव मते यांच्या नावाने आमुखत्यारपत्र तयार केले. त्या आमुखत्यारपत्राद्वारे १६ मार्च २००१ ला मतेकडून ती जमीन स्वत: ४ लाख ६० हजार रुपयांत खरेदी केली. त्यानंतर जागेचा ताबा घेऊन दीड एकरावर भूखंड पाडून त्यांची विक्री केली. हा प्रकार २००२ मध्ये ऐश्वर्या गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना समजला. त्यानंतर संस्थेच्या सचिव शोभाराणी राजेंद्र नलोडे यांनी अजनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आता शोभाराणी नलोडे आणि इतर पाच जणांनी एसआयटीकडे अ‍ॅड. उके यांनी बनावट दस्तावेज तयार करून जमीन हडपल्याची तक्रार दिली. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सतीश उके, त्यांचा भाऊ प्रदीप उके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद आहे.

प्रथमदर्शनी उकेंनी भूखंड हडपल्याचे दिसते

ऐश्वर्या गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या तक्रारीवर तपास सुरू आहे. विठ्ठल ढवळे यांचे बयाण नोंदविले असून त्यांनी ऐश्वर्या संस्थेला भूखंड विकला. त्यानंतर कुणालाही आममुखत्यारपत्र करून दिलेले नाही. शिवाय चंद्रशेखर मते हे कोण आहेत, अद्याप सापडलेले नसून त्यांचा कुठला पत्ताही नाही. त्यामुळे अ‍ॅड. उके यांच्याकडून भूखंड हडपण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. गुन्हा दाखल करण्यापूर्वी उके यांच्याकडून भूखंड खरेदी करणाऱ्यांचीही बाजू जाणून घेण्यात येत आहे.

सोमनाथ वाघचौरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, एसआयटी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur land scams ad satish uke
First published on: 21-07-2017 at 02:30 IST