अमरावती : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील पुलावर नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील लोहोगावनजीक भलेमोठे भगदाड पडल्‍याचे निदर्शनास आल्‍याने या पुलाच्‍या बांधकामाच्‍या दर्जाविषयी प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले जात आहे.

समृद्धी महामार्गावरील लोहोगाव येथील पुलावर अचानक खड्डा पडला. महामार्गाजवळून काही शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. प्रशासनाला लगेच याची माहिती देण्‍यात आली. प्रशासनाने या जागेवर तात्‍पुरते कठडे उभारून वाहतूक वळवली. वेळीच या घटनेची माहिती मिळाल्‍याने संभाव्‍य अपघात टळला.

हेही वाचा…बच्चू कडू यांचे अध्यक्षपद वाचविण्यासाठी महायुतीची धडपड

मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावरील भरवीर–इगतपुरी दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अखेर पूर्ण झाले असून हा २५ किमी लांबीचा टप्पा सोमवार, ४ मार्च रोजी वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्‍याआधीच पुलावर खड्डा पडल्‍याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा…विश्लेषण : खासदार नवनीत राणांच्‍या जात प्रमाणपत्राचे प्रकरण काय?

समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरू होऊन अवघ्‍या १४ महिन्‍यांचा कालावधी झाला आहे. नागपूर आणि मुंबईला जोडणारा ७०१ किलोमिटर लांबीचा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पण, या महामार्गावर आजवर अनेक लहान-मोठे अपघात झाले आहे. आता बांधकामाच्‍या दर्जाविषयी देखील प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले जात आहे.