क्रुरकर्मा विवेकची कबुली; महिनाभरापासून खुनाची योजना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : पत्नीच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटका होऊन कारागृबाहेर पडल्यापासून कमलाकर पवनकर हे बहिण अर्चनाच्या माध्यमातून सव्वा दोन एकर शेती नावावर करून देण्यासाठी दबाव टाकत होते. तर हॉटेलमध्ये काम करून मिळणाऱ्या सहा हजार रुपयांपैकी दोन मुलांच्या संगोपनासाठी पाच हजार रुपये घेतले होते. सर्व बाजूंनी त्यांनी आपली आर्थिक कोंडी केली होती, त्यामुळेच त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्याकरिता महिनाभरापासून त्याच्यावर पाळत ठेवली होती. मात्र, कमलाकर हा घराबाहेर सापडला नाही. त्यामुळे त्याच्यासह इतरांचाही हत्या करावी, अशी कबुली क्रुरकर्मा विवेक गुलाब पालटकर याने पोलिसांसमोर दिली.

११ जून २०१८ च्या मध्यरात्री नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधानगर येथील रहिवासी कमलाकर मोतीराम पवनकर, त्यांची आई मीराबाई पवनकर, पत्नी अर्चना, मुलगी वेदांती व आरोपीचा मुलगा कृष्णा यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. खुनाच्या वेळेपासून विवेक हा फरार होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय होता. शेवटी त्याला  गुरुवारी पंजाबमधील लुधियाना येथील एका झोपडपट्टीतून अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले, अशी माहिती पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर व गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम उपस्थित होते.

विवेकने आयटीआय क ेले असून पत्नीच्या हत्येच्या आरोपातून त्याची. एप्रिल २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका केली. तेव्हापासून तो नागपुरात सीताबर्डी परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करीत होता व भाडय़ाच्या खोलीत राहात होता. त्याने कमलाकर याच्याकडे राहणारे दोन मुले घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कमलाकरने गावातील घर दुरुस्त केल्याशिवाय मुले घेऊन जाण्यास मनाई केली. त्यानंतर त्याला कारागृहातून बाहेर काढण्यासाठी न्यायलयीन प्रक्रियेवर झालेला खर्च मागण्यासाठी कमलाकर हा बहिण अर्चनाच्या माध्यमातून सव्वादोन एकर शेती नावावर करून देण्यासाठी दबाव टाकत होता. तर मुलांच्या संगोपनासाठी हॉटेलमधून मिळणाऱ्या सहा हजारांपैकी पाच हजार रुपये मागायचा. पैशावरून कमलाकर वारंवार टोकत होता. त्याचा राग मनात होता व त्याला संपवण्याचा निर्णय घेतला.

महिनाभरापासून त्याच्या खुनाची योजना आखली. मात्र, तो घराबाहेर कुठेच एकटा सापडत नव्हता. त्यामुळे १० जूनच्या रात्री ९ वाजता आपण दुचाकीला सब्बल बांधून खून करण्याच्या योजनेतून त्याच्या घरी मुक्कामाला गेलो. सब्बल फाटकाबाहेर काढून ठेवली व दार ठोठावले. मात्र, दार कुणीच उघडले नाही. पण, घराच्या विरुद्ध दिशेला राहणाऱ्या एकाने कमलकरला भ्रमणध्वनीकरून दारावर मेहुणा आल्याचे सांगितले. त्यानंतर अर्चनाने दार उघडले.

आपलं जेवण झालेलं असून केवळ रात्री मुक्कामासाठी आलेलो असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वजन जेवण करून चार मुलांना घेऊन कमलाकर व अर्चना आतल्या खोलीत झोपले. तर मीराबाई व आपण बैठक खोलीत झोपलो होतो, अशी माहिती आरोपी विवकेने पोलिसांना दिली.

असे झाले हत्याकांड

कमलाकरचा खून करण्यासाठी आणलेली सब्बल रात्री ३ वाजता भींतीवरून उडी मारून आतमध्ये आणली. त्यानंतर कमलाकरच्या डोक्यावर मारली. मात्र, सब्बल लांब असल्याने त्याच्या बाजूला झोपलेले कृष्णा व वेदांती यांनाही लागली. आवाजाने बहिण अर्चना जागी झाली व रक्त बघून ओरडणार व आपण पकडले जाऊ म्हणून तिच्याही डोक्यात सब्बल हाणली. त्यानंतर ते निपचित पडल्यावर त्यांच्यावर पुन्हा वार केले. दरम्यान आवाजाने बैठक खोलीत झोपलेल्या मीराबाई या उठून आल्यने त्यांनाही  संपवले. त्यानंतर फाटक उघडून दुचाकीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, फाटकाचे कुलपू उघडले नाही व भींतीवरून उडीमारून बाहेर पडलो. त्याच ठिकाणी सब्बल फेकली व खोलीवर येऊन कपडे बदलले. बॅगमध्ये कपडे भरले व ऑटोने सकाळी ९ वाजता एका रेल्वेने दिल्ली गाठली. दिल्लीतून लुधियानाला पोहोचलो,असे  विवकेने कबुली जबाबात सांगितले.

मोबाईल चोरल्याने मिळाला आरोपी

लुधियाना रेल्वेस्थानकावर एक मजूर भेटला. त्याला कामाच्या शोधात असल्याचे सांगितले. त्यानंतर तो सोबत घेऊन गेला.शहराच्या बाहेर असलेल्या एका झोपडपट्टीत त्याने खोलीकरून दिली. या  मजुरानेच दोन मोबाईलपैकी एक मोबाईल चोरला. व  तो सुरू केला. तेव्हा पोलिसांना त्याचे लोकेशन समजले. त्यानंतर गुन्हे शाखेचे परिमंडळ-४ चे एक पथक लुधियाला गेले. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचून आरोपीला बेडय़ा ठोकल्या व नागपुरात आणले, अशी माहिती बोडखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पैसा व जमिनीसाठी त्रास

नवरगाव येथे आपली नऊ एकर शेती आहे. त्यापैकी सव्वादोन एकर शेती सावत्र बहिण रंजनाला दिली. तेवढीच जमीन कमलाकर मागत होता. दरम्यान पत्नीच्या खुनात आपण कारागृहात असताना जमिनीचे व्यवहार अर्चना व कमलाकर करायचे. यातून वर्षांला ७० हजार रुपये मिळत होते. तेच पैसे त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर खर्च केले. त्यानंतर ते पैसा व जमिनीसाठी त्रास देत होते, अशी माहिती विवेकने पोलिसांना दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police arrested palatkar families killer
First published on: 23-06-2018 at 04:51 IST