नागपूर: भारतातून नोकरी- शिक्षण, पर्यटनासह इतर कामानिमित्त आफ्रिकन देशात जायचे असल्यास संबंधिताला पिवळ्या तापासाठी प्रतिबंधात्मक लस घ्यावी लागते. मध्य भारतातील आफ्रिकन देशात जाणाऱ्यांना पूर्वी या लसीसाठी निवडक खासगी केंद्रात हजारो रुपये मोजावे लागत होते. आता मध्य नागपुरातील एका शासकीय रुग्णालयात सुविधा झाल्याने नागरिकांची हजारो रुपयांची बचत होत आहे.
नागपूरसह मध्य भारतातील नागरिकांना केनिया किंवा दक्षिण आफ्रिकेतील काही देशांमध्ये ‘पिवळ्या तापा’ची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिवळ्या तापाची लस टोचून घ्यावी लागते. आंतरराष्ट्रीय व्हिजा नियमांतर्गत ही लस टोचून घेणे बंधनकारक आहे. पूर्वी आफ्रिकन देशात जाण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांना लस टोचण्यासाठी राज्यात आरोग्य विभागाची मुंबई व पुण्यातच सुविधा होती. कालांतराने नागपुरातील खासगी केंद्रात सोय झाली. पण येथे अव्वाच्या सव्वा शुल्क आकारून सर्वसमान्यांची लूट होण्याच्या तक्रारी वाढल्या.
हेही वाचा : ‘आरटीई’च्या जागा २२,४११ अन् अर्ज अवघे १४२१… प्रवेश प्रक्रियेतील बदलांमुळे अमरावतीतील पालकांची…
दरम्यान, नागपुरातील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात हे केंद्र सुरू करण्यासाठी तत्कालिन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी यासंदर्भात प्रस्ताव पाठविला. त्याला मंजुरी मिळाली. २०२२ मध्ये डागा रुग्णालयात हे केंद्र स्थापित झाले. सुरुवातीला या केंद्रात लस देण्यासाठी नियमित डॉक्टर नव्हते. जेव्हा डॉक्टरांची गरज असायची तेव्हा डॉक्टरांना बोलावून घ्यावे लागायचे. परंतु आता नियमित जनरल फिजीशियन उपलब्ध झाल्याने प्रत्येक शुक्रवारी ही लस दिली जाते.
वर्षाला ५०० जणांना लस
नेहमीच्या तुलनेत उन्हाळ्यात मोठ्या संख्येत लोक आफ्रिकन देशात फिरायला जातात. त्यामुळे लसीची मोठी मागणी असते. त्यादृष्टीने तशी तयारी करून ठेवली जाते. सध्या दर शुक्रवारी ५० ते ६० लोकांना ही लस दिली जात आहे. तर वर्षाला ५०० हून जास्त नागरिकांना ही लस टोचून दिली जाते, अशी माहिती डागातील येलो फिव्हर लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण नवखरे यांनी दिली.
हेही वाचा : सूर्यदेव कोपले! मे महिन्यात देशातील ‘या’ राज्यांमध्ये उष्णतेची लाट
लस घेण्यासाठी काय कराल?
ही लस घेणाऱ्यांना सुरुवातीला डागा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाचे कार्ड काढावे लागते. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर व कुठलाही आजार नसल्याची खात्री पटल्यावर प्रवाशाला लस दिली जाते. लस देण्यापूर्वी एक अर्ज भरून द्यावा लागतो. सोबतच मूळ आधारकार्ड व पासपोर्ट दाखवावा लागतो. त्याची झेरॉक्स प्रत द्यावी लागते. याची तपासणी झाल्यावर ५०० रुपये शुल्क भरावे लागते. लस दिल्यावर अर्धा तास बसून राहावे लागते.
येलो फिव्हर लस देण्यासाठी शुक्रवार हा दिवस ठरला असला तरी मागणी वाढल्यास इतरही दिवशी लस देण्याची सोय उपलब्ध आहे. या लसीकरण केंद्राचा फायदा आफ्रिकन देशात जाणाऱ्यांना होत आहे.
-डॉ. सीमा पारवेकर, वैद्यकीय अधीक्षक, डागा रुग्णालय.