निवड समितीच्या अध्यक्षपदी न्या. दिलीप भोसले

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवड समितीच्या अध्यक्षपदी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची तर सदस्य सचिव म्हणून पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाला लवकरच नवे कुलगुरू मिळणार आहेत.

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे ६ एप्रिलला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बैठक घेऊन विद्यापीठाने नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी विद्वत आणि व्यवस्थापन परिषदेच्या संयुक्त समितीने सदस्य म्हणून आयआयटी कानपूरचे संचालक प्रो. अभय करंदीकर यांची निवड केली होती. मात्र, दोन महिन्यांपासून राज्यपाल कार्यालयाकडून अध्यक्षांची निवड न झाल्याने कुलगुरू निवडीची प्रक्रिया थांबली होती. अखेर राज्यपालांनी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची अध्यक्षपदी निवड केल्याने लवकरच कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दर पाच वर्षांनी कुलगुरूंची निवड केली जाते. यासाठी समिती स्थापन केली जाते. यानुसार आज बुधवारी राज्यपाल कार्यालयाने समितीचे अध्यक्ष व सदस्य सचिवाच्या नावाची घोषणा केली. समितीची घोषणा झाली असली तरी, प्रत्यक्षात अध्यक्षांसोबत सदस्यांची एकही बैठक झाली नसल्याने कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही.

बैठक होताच, जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.  डॉ. काणेंच्या निवृत्तीनंतर कुलगुरू पदाची धुरा ही काही काळ प्रभारींच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे. गतवेळी नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी देशभरातून जवळपास १३२ अर्ज आले होते. त्यापैकी छाननी समितीने १८ अर्ज अंतिम केले होते. त्यापैकी पाच व्यक्तींची मुलाखतीसाठी निवड केली होती. त्यातून नागपूर विद्यापीठामध्ये प्राध्यापक असलेल्या डॉ. काणेंची कुलगुरूपदी निवड करण्यात आली होती हे विशेष.

इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी इच्छुकांसह प्राध्यापकांचे नेतृत्व करणाऱ्या काही संघटनांनीही मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या विद्यापीठातील विविध प्राधिकरणांवर एका विशिष्ट गटाचे वर्चस्व असल्याने कुलगुरूही आपल्याच गटाचा बनावा, यासाठी वरच्या पातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे.