मित्रांच्या गप्पा, कॉलेज कट्टय़ामुळे जिवंतपणा
नागपूर : तब्बल दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाविद्यालयाची दारे बुधवारी उघडल्याने उत्साहाचे वातावरण होते. सकाळच्या सत्रापासूनच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत येण्यास सुरुवात केली. उपस्थिती कमी असली तरी महाविद्यालयात येण्याचा उत्साह हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पुन्हा एकदा मित्रांच्या गप्पा, कॉलेज कट्टा, कॅन्टींगमधील मस्ती सारेच काही रंगल्याने महाविद्यालयांमध्ये जिवंतपणा आला होता.
करोनानंतर महाविद्यालय बंद असल्याने मागील वर्षांपासून प्रवेश घेऊनही विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रत्येक्ष वर्गाचा आनंद घेताच आला नाही. ऑनलाईन वर्गातून शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी तब्बल एक शैक्षणिक सत्र पूर्ण
केले. मात्र, बुधवारपासून महाविद्यालयांमधील चैतन्य पुन्हा परत आले. महाविद्यालयांनीही दीड वर्षांनी महाविद्यालय सुरू होत असल्याने तशी तयारी केली होती. पहिल्या दिवशी सर्वच महाविद्यालये सुरू झाली नसली तरी अनेकांनी स्वच्छतेसह संपूर्ण तयारी केली आहे. मुंडले महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी प्रत्यक्ष वर्ग भरले नसले महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या गर्दीच्या उत्साहाचे वातावरण होते. विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरामध्ये प्रत्येक विभागांसमोर विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. महाविद्यालयच बंद असल्याने नियमित भेटही होत नसल्याने दीड वर्षांच्या गप्पांमध्ये तरुणाई रंगली होती. येथील कॅन्टींगमध्ये विद्यार्थ्यांची जाम गर्दी केली होती. महाविद्यालयांमध्ये प्रवेश देताना करोना लसीच्या दोन मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, लसीचे प्रमाणपत्र तपासणारी यंत्रणाच दिसून आली नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रवेश दिला जात होता. पहिल्या दिवशी उपस्थिती कमी असली तरी लवकरच विद्यार्थ्यांची गर्दी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मर्यादित उपस्थिती पण उत्साह कायम
महाविद्यालय सुरू झाल्याचा मनस्वी आनंद आहे. यामुळे महाविद्यालयांमध्ये पुन्हा जिवंतपणा आला. विद्यार्थ्यांमध्येही प्रत्येक्ष वर्गामध्ये बसण्याची उत्सुकता आहे. करोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. उपस्थिती कमी असली तरी ती पूर्वपदावर येईल असा विश्वास प्रा. डॉ. सतीश चाफले यांनी व्यक्त केला.
प्रत्यक्ष वर्ग नाही
महाविद्यालयांमध्ये पहिल्या दिवशी सरासरी २० टक्के उपस्थिती होती. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशासंदर्भात असलेली कामे पहिल्या दिवशी पूर्ण केली. काही नामवंत महाविद्यालये वगळली तर पहिल्या दिवशी प्रत्येक्ष वर्गाना सुरुवात झाल्याचे दिसून आलेले नाही. पहिल्या दिवशी ऑनलाईन ग्रुपवर विद्यार्थ्यांना पुढील सूचना देण्यात आल्या असून नियमित वर्गानाही लवकरच सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
महाविद्यालयीन शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास होऊ शकत नाही. येथे अनेक विषयांवर चर्चा घडते. मात्र दीड वर्षांपासून सारेच बंद होते. मित्र मैत्रिणींसोबतच भेट व्हायची ती फक्त समाज माध्यमांवरच. आता महाविद्यालय सुरू झाल्याने प्रत्यक्ष वर्गाचा आनंद घेता येईल.
– मानसी ठेंगडी, विद्यार्थिनी.
मागील वर्षी प्रथम वर्षांला प्रवेश घेतला मात्र, महाविद्यालयात येताच आले नाही. त्यामुळे कधी एकदा महाविद्यालय सुरू होतात व प्रत्यक्ष वर्गात बसण्याची संधी मिळते याची प्रतीक्षा होती. आज महाविद्यालयात आल्याने फार आनंद झाला. -रितेश जामगडे, विद्यार्थी.