नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अपघाताबाबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेले आरोप चुकीचे आहे. महाराष्ट्र संस्कारमय आहे. असे घातपात महाराष्ट्रात कोणी करत नाही आणि त्यांना महाराष्ट्राचे संस्कार कळले नाही. अशा घटनेमध्ये जे राजकारण करतात ते चुकीचे आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे आता महायुती अजून मजबूत होईल

एकीकडे उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेसच्या दावणीला बांधले गेले आहेत. हिंदू विरोधी असलेल्या स्टॅलिनला साथ देत आहे. त्यात राज ठाकरे हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असताना त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे त्यामुळे आता महायुती अजून मजबूत होईल, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – रश्मी बर्वे यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली याचिका, आता निवडणुकीत…

चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार करून काँग्रेसला साथ दिली आणि शिवसेनेच्या विचाराला मूठमाती दिली. स्वतःच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी बेईमानी केली आहे. ते हिंदुत्व विरोधी आहे. केवळ सत्तेसाठी त्यांना सोनिया गांधी, शरद पवारांकडे जावे लागत आहे, हेच दुर्देव असल्याचे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा – “भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”

राज ठाकरे यांना आम्ही कधीही कमळावर लढा असा आग्रह धरला नाही. त्यांना कमळावर लढा असे आम्ही कधीच म्हणणार नाही आणि म्हटले नाही. राज ठाकरे यांच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व असून त्यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. यामुळे राज्यात आता महायुती अधिक मजबूत होईल असेही बावनकुळे म्हणाले. देशाचे पंतप्रधान मोदी व्हावे म्हणून त्यांनी पाठिंबा दिला आहे. आता विधानसभा निवडणुकीत पुढे काय होईल याबाबतचा निर्णय ते घेतील असेही बावनकुळे म्हणाले.