scorecardresearch

Premium

नाहीच कुणी अपुले रे, प्राणांवर नभ धरणारे..!

फेसबुक पोस्टपुरती उरली ग्रेसांची आठवण

ग्रेस यांच्या निवासस्थानासमोर लावलेला स्मृती फलक
ग्रेस यांच्या निवासस्थानासमोर लावलेला स्मृती फलक

फेसबुक पोस्टपुरती उरली ग्रेसांची आठवण; ‘नगर भूषण’ संबोधणाऱ्या महापालिकेलाही विसर

नागपूर : कवी ग्रेस लिहायचे, नाहीच कुणी अपुले रे, प्राणांवर नभ धरणारे, दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे..वरकरणी ही कवितेची ओळ वाटत असली तरी ती केवळ कविता नव्हती. ग्रेसांच्या अंर्तमनात खोल तळाशी खदखदणारा तो जणू ज्वालामुखी होता. श्वासांचे विश्रब्ध किनारे दूर अनंताशी एकरूप होत असताना आपली कुणीच कशी दखल घेत नाही, अशी खंत कदाचित ग्रेसांची असावी. ही खंत ग्रेस जिवंत असताना दूर झाली नाही आणि ते जाऊन आता सात वर्षे झाली तरी ती दूर होताना दिसत नाही. २६ मार्च ग्रेसांचा स्मृतीदिन. पण, या दिवशी शहरात कुठेच त्यांच्या आठवणींचा जागर झाला नाही. ग्रेसांना अभिमानाने ‘नगर भूषण’ संबोधणाऱ्या महापालिकेलाही त्यांनीच लावलेल्या स्मतिफलकावर दोन फुले वाहण्यासाठी वेळ मिळाला नाही.

कविवर्य ग्रेस जाऊन सात वर्षे उलटले. कर्करोगाशी सुमारे तीन वर्षे लढा दिल्यानंतर पंचाहत्तराव्या वर्षी म्हणजे २६ मार्च २०१२ या दिवशी ग्रेस यांचे पुण्यात निधन झाले. मंगळवारी त्यांची पुण्यातिथी होती. मात्र, एरव्ही प्राचीन काळातील दुर्मिळ कवींच्या जयंती-पुण्यतिथी शोधून काढून वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या साहित्य संस्थांनाही ग्रेसांची आठवण झाली नाही.  ग्रेसांच्या धंतोलीतील निवासस्थानासमोर महापालिकेने लावलेल्या स्मृती फलकावर अभिवादनाचे दोन फूल वाहण्यासाठी महापालिकेलाही सवड मिळाली नाही.  शहरातील साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील ज्या मान्यवरांच्या नावाने शहराची ओळख होती त्यांच्या स्मृती जपण्यासाठी महापालिकेने निवासस्थानासमोर स्मृती फलक लावण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत ग्रेस यांच्या धंतोली येथील निवासस्थानासमोर चार वर्षांपूर्वी हा स्मृती फलक लावला होता. नाही म्हणायला, ग्रेसांच्या काही मोजक्या चाहत्यांनी फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर ग्रेसांच्या गाजलेल्या चार-दोन कविता पोस्ट केल्या. त्यातून ग्रेस दिवसभर रुणझुणत राहिले. कधी चंद्रमाधवीच्या निरव प्रदेशात तर कधी ओल्या वाळूची बासरी वाजवत संध्यामग्न प्राचीन नदीच्या काठावर. पण, ग्रेसांचे साहित्यातील योगदान खरच इतकेच मर्यादित होते?

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nmc also forgot writer and poet grace on his memorial day

First published on: 27-03-2019 at 02:47 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×