नागपूर: आता गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा नोंदणी प्रमाणपत्रातच संबंधित प्रकल्पाची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती नमूद असणार आहे. त्यामुळे नवीन गाळे घेणाऱ्या ग्राहकांची फसवणूक थांबण्यास मदत होणार आहे.
महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहकांना प्रकल्पाबाबतची कुठली प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते, हे लक्षात घेऊन ग्राहककेंद्रीत अमुलाग्र बदल केले आहेत. पूर्वीच्या प्रमाणपत्रात फक्त प्रकल्प आणि प्रवर्तकाचे नाव, पत्ते एका ओळीत दिले जायचे. आता ही माहिती वाचायला आणि समजायला सोपी जावी यासाठी बुलेट पॉईंट्स मध्ये दिलेली आहे. शिवाय या प्रमाणपत्राच्या परिशिष्टात प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ, इमारतीचे व विंग्सचे नाव किंवा क्रमांक, प्रकल्पातील निवासयोग्य मजले, प्रकल्पातील निवासी सदनिका आणि अनिवासी गाळ्यांची एकूण संख्या, इमारतीला किती मजल्यांपर्यंत परवानगी मिळालेली आहे त्याचा तपशील दर्शवणारे अत्यंत महत्त्वाचे प्रारंभ प्रमाणपत्र, चारचाकी, दुचाकी आणि अभ्यागतांसाठींच्या एकूण पार्किंगची संख्या हा समग्र तपशील या प्रमाणपत्राच्या परिशिष्टात पहिल्यांदाच असणार आहे. एवढेच नाही पुढे त्या प्रकल्पाच्या आयुष्यात प्रवर्तकाने प्रकल्पाच्या कुठल्याही बाबीत काही दुरुस्त्या केल्यास, प्रकल्पाला मुदतवाढ घेतल्यास किंवा प्रकल्पाचे दुसऱ्या प्रवर्तकाकडे हस्तांतरण केल्यास हा तपशीलही या प्रकल्पाला भविष्यात दिल्या जाणाऱ्या सुधारित प्रमाणपत्रात राहणार आहे.
प्रमाणपत्र कुठे बघता येते…
सर्व प्रवर्तक हे प्रमाणपत्र प्रकल्पस्थळी, प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ठळकपणे प्रदर्शित करतात. प्रकल्पाच्या नोंदणीक्रमांकाच्या मदतीने प्रकल्पाबाबतची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर शोधताना पहिल्याच पानावर या प्रमाणपत्राची लिंक असते. त्यातही प्रमाणपत्र बघता येते. शिवाय प्रकल्पाशी संबंधित सर्व प्राथमिक माहिती क्यूआर कोड मध्ये देऊन सर्व माध्यमांतील जाहिरातींमध्ये प्रकल्पाच्या नोंदणीक्रमांकासोबत छापणे पूर्वीच महारेराने बंधनकारक केलेले आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करूनही प्रकल्पाशी संबंधित प्राथमिक माहिती मिळवता येऊ शकते.
महारेराचे अध्यक्ष काय म्हणतात?
बहुतेकजण आयुष्यभराची कमाई गुंतवून घरखरेदी करतात. ही गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे. म्हणूनच प्रकल्पाला नोंदणीक्रमांक देताना त्याची कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक छाननी करून नोंदणीक्रमांक मंजूर केले जाते. शिवाय घरखरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रमाणित घर विक्री करार, घराचे नोंदणीपत्र , पार्किंग, आश्वासित सोयी सुविधा याबाबत अपरिवर्तनीय अशा तरतुदी या अनुषंगाने यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहे. आता महारेराच्या नोंदणी प्रमाणपत्रावर आवश्यक मजकूर राहणार असल्याने सामान्यांना लगेच ते कळू शकेल, अशी माहिती महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी दिली.
महारेराच्या नोंदणी प्रमाणपत्रात नवीन काय?
- गृहनिर्माण प्रकल्पाचे व प्रवर्तकाचे नाव, पत्ता, नोंदणीक्रमांक हा तपशील आता वाचायला, समजायला सोपा जावा म्हणून बुलेट पाॅइंटसमध्ये
- प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्रफळ, इमारतीचे, विंगचे नाव व क्रमांक
- प्रकल्पाचे निवासयोग्य मंजूर मजले, निवासी व अनिवासी इमारतींची माहिती
- बांधकाम परवानगी किती मजल्यापर्यंत आहे हे दर्शवणारे प्रमाणपत्र
- चारचाकी, दुचाकी, अभ्यागतांसाठी अशी एकूण सर्व पार्किंग किती
- संबंधित प्रकल्पात भविष्यात काही दुरूस्त्या, मुदतवाढ असल्यास
- प्रकल्प दुसऱ्या प्रवर्तकाला हस्तांतरीत झाल्यास तोही तपशील वेळोवेळी जारी होणाऱ्या प्रमाणपत्रात असणार