कृषी उत्पन्न बाजार समितीत दर्जेदार कांदाच नाही; किरकोळ बाजारात दर ६० ते ७० रुपये प्रतिकिलो

कांद्याचे पीक काढणीवर असताना विलंबाने आलेल्या परतीच्या पावसामुळे यंदा कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जवळपास पन्नास टक्केकांदा ओला झाला. परिणामी, नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर्जेदार कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचा भाव ६० ते ७० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला. नवा कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याचा भाव शंभर पार करण्याची शक्यता व्यापापाऱ्यांनी वर्तवली आहे.

यंदा परतीच्या पावसाने कांद्याच्या शेतीचे मोठे नुकसान केले आहे. परतीच्या पाऊस विलंबाने आल्यामुळे कांद्याचे पीक पाण्याखाली गेले. यामुळे मागणीच्या तुलनेत उत्पादनात घट झाली. दर्जेदार कांदा बाजारातून नाहीसा झाला आहे. कांद्याचे दरही वधारले आहेत. दररोजच्या आहारत सर्वात महत्त्वाचा असलेला कांदा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चच्रेत राहतो. मात्र यंदा परतीच्या पावसामुळे तब्बल पन्नास टक्के कांदा ओला झाल्याने वाया गेला. त्यामुळे नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक अध्र्यावर आली. नागपूरच्या कळमना बाजारपेठेत धुळे, जळगाव, नाशिक येथून मोठय़ा प्रमाणात कांदा येतो. बाजारात दररोज वीस ट्रक कांदा येत आहे. मात्र तो कर्नाटक आंध्रप्रदेशातून येत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या ठोक बाजारात कांदा पन्नास रुपये प्रतिकिलो असून तो किरकोळ बाजारात ७० रुपयांपर्यंत पोहचला आहे. नवा कांदा येणास असून अवकाश असल्याने यंदा कांदा चांगलाच रडवणार असल्याचे दिसते. मागणी वाढून आवक घटल्याने व्यापाऱ्यांनी जुन्या कांद्याची मोठय़ा प्रमाणात साठवणूक सुरू केली होती. मात्र आता जुना कांदाही संपण्याच्या मार्गावर असून बाजारात दर्जेदार कांद्याची आवक कमी आहे.

इतर राज्यातून, दिल्ली, आग्रा येथे इराण, अफगाणिस्तान येथून कांदा येत असल्याने एकूण कांदा बाजारात फारशी कमतरता जाणवत नाही. परंतु दर्जेदार कांद्याचे भाव सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत. पुढील महिनाभर कांद्याचे भाव अजून वधारण्याची चिन्हे असून दर्जेदार कांद्यासाठी नागपूरकरांना वाट पाहावी लागणार आहे.

पूर्वीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक कमी आहे. दर्जेदार कांदा कमी आहे. इतर राज्यातून कांदा येत असल्याने दर वाढलेले आहेत. नव्या कांदा पिकाला पावसाने झोडपल्याने सध्यातरी कांद्याचे भाव कमी होण्याचे चिन्ह नाही. – जयप्रकाश वासाणी, अध्यक्ष कांदा बटाटा बाजार कळमना.