मेडिकलमधील सीटी स्कॅन यंत्र बंद!

नागपूर : उपराजधानीतील म्युकरमायकोसिसचे (काळी बुरशी) सर्वाधिक रुग्ण मेडिकल रुग्णालयात उपचार घेत आहेत. दुसरीकडे येथील एमआरआयपाठोपाठ सीटी स्कॅन यंत्रही बंद पडले आहे. हे यंत्र सुरू होण्यासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना सूक्ष्म तपासणीसाठी ट्रामा केअर सेंटरच्या सीटी स्कॅनपर्यंत जावे लागत असल्याने मन:स्ताप होत आहे, तर दुसरीकडे ट्रामा केअर सेंटरमध्ये आता करोना आणि म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वेगवेगळी वेळ निश्चत झाल्याने रुग्णांना तपासणीसाठी ताटकळत रहावे लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेडिकलमध्ये एमआरआय यंत्र कालबाह्य़ झाले आहे. परंतु अद्यापही नवीन यंत्राचा पत्ता नाही. दुसरीकडे एमआरआय बंद असल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची तपासणी येथील सीटी स्कॅनवर करावी लागत होती. परंतु हे सीटी स्कॅन यंत्रही त्यातील काही भागात बिघाड झाल्याने बंद पडले आहे. त्यातच हे सुटे भाग यायला आणखी काही दिवसांची प्रतीक्षा असल्याने आता येथील रुग्णांना सीटी स्कॅनसाठी ट्रामा केअर सेंटरमध्ये पाठवले जात आहे. म्युकरमायकोसिसचे बरेच रुग्ण गंभीर संवर्गातील आहेत. त्यातच त्यांना आता या तपासणीसाठी इतरत्र जावे लागत असल्याने मन:स्ताप होत असल्याच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत.

त्यातही करोनाग्रस्त रुग्णांचे एचआरसीटी तपासणी होणाऱ्या यंत्रावर करोनातून बरे झालेल्या व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांची तपासणी होत असल्याने पुन्हा या रुग्णांना करोनाची लागण झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न नातेवाईक विचारत आहेत. मेडिकलमध्ये बुरशीच्या आजाराचे १२२ रुग्ण आहेत. त्यांचे एमआरआयऐवजी सीटी स्कॅन करण्यात येत आहे. मात्र आता मेडिकलमधील सीटी स्कॅन बंद पडले. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटरमधील संबधित डॉक्टरांना भ्रमणध्वनीवर फोन केल्यास चुकीचा क्रमांक असल्याचे सांगत  फोन कापण्यात येत असल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. या विषयावर मेडिकलचे अधिष्ठाता, क्ष-किरणशास्त्र विभागाचे प्रमुख, वैद्यकीय अधीक्षकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patients mucormycosis nagpur medicals black fungus ssh
First published on: 08-06-2021 at 01:28 IST