गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन, सालीगाव पोलिसांची माहिती

प्रसिद्ध परफ्युम डिझायनर मोनिका रमेश घुरडे (३९) हिची शुक्रवारी गोव्यातील सनगोल्डा भागातील एका फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली. यावेळी तिच्या मृतदेहावर कपडे नव्हते. त्यामुळे तिच्यावर बलात्कार करून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात सालीगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविला असून वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच बलात्काराची पुष्टी करता येऊ शकेल. मात्र, प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले. यामुळे हत्याकांडातील आरोपी मोकाटच आहेत.

मोनिकाचे वडील हे न्यायाधीश होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. घरचे कुटुंबीय मूळचे अमरावती येथील असून वडिलांच्या नोकरीनिमित्त ते मुंबईत स्थायिक झाले. तिने सुरुवातील छायाचित्रकार म्हणून करिअर केले. परंतु तिला सुगंध ओळखण्याची आवड असल्याने तिने २००९ मध्ये परफ्युम डिझायनर म्हणून करिअर केले आणि त्यात तिला प्रचंड यश मिळाले. २०११ मध्ये ती गोव्याला गेली आणि तेथेच स्थायिक झाली. एका भाडय़ाच्या फ्लॅटमध्ये ती राहायची. नागपुरात तिचे मामा राहतात. तिच्या वडिलांचे गोकुळपेठ परिसरात घर असून त्या निमित्ताने ती नागपुरात यायची. काही महिन्यांपूर्वी ती नागपुरात येऊन गेलेली होती. काल शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास तिच्या शेजारी राहणारी एक अमेरिकन महिला तिला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी तिचे घर बंद होते आणि आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्या महिलेकडे असलेल्या मोनिकाच्या घराच्या बनावट चावीने दार उघडले असता बेडवर मोनिकाचे हातपाय बांधलेले होते आणि ती मृतावस्थेत दिसली. त्यानंतर ताबडतोब महिलेने गोवा पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी पंचनामा केला त्यावेळी मोनिकाच्या अंगावर कपडे नव्हते. त्यामुळे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. परंतु बलात्कारासंदर्भात अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबईवरून तिचे दोन भाऊ ताबडतोब गोव्याला पोहोचले असून शवविच्छेदनानंतर तिच्यावर गोव्यातच अंत्यसंस्कार करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.