गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार तसेच विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या प्रचाराला सुरुवात होऊन दहा दिवस लोटले. परंतु माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचा कुठेच पत्ता नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राजकीय विरोधक असलेले काका मंत्री धर्मरावबाबा आत्राम महायुतीत सामील झाल्यापासून ते अज्ञातवासात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे त्यांचे मन वळविण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात अहेरी येथील आत्राम राजघराण्याचे वेगळे महत्त्व आहे. गेल्या चार दशकांपासून या घराण्याचे राजकीय वर्चस्व अनेकांना मोडता आले नाही. त्यामुळे या घराण्यातील नेत्यांनी पाचवेळा मंत्रिपद उपभोगले आहे. यात सर्वाधिक संधी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांना मिळाली, तर भाजपचे नेते अम्ब्रीशराव आत्राम यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. त्यानंतर अम्ब्रीशरावांना काका धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. दोघांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे.

हेही वाचा…अकोल्यात प्रहारचा महायुतीला धक्का; काँग्रेसला पाठिंब्याचा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा ठराव

या काका-पुतण्यामध्ये असलेले टोकाचा राजकीय विरोध भाजपच्या वाटेत अडसर ठरत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला महायुतीकडून मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे लोकसभेसाठी इच्छुक होते. परंतु अशोक नेते यांना संधी मिळाली. आत्राम यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते की, महायुती ज्याला तिकीट देईल आम्ही सर्व त्यांच्यासाठी काम करू. त्याप्रमाणे धर्मरावबाबा नेते यांच्या सोबतीने संपूर्ण लोकसभा क्षेत्र पिंजून काढण्यात व्यस्त आहे. परंतु अम्ब्रीशराव आत्राम यांच्या प्रचाराचा अद्याप मुहूर्त न निघाल्याने भाजप कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे. काकांशी असलेल्या राजकीय विरोधामुळे ते एका मंचावर येत नसल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, धर्मरावबाबा आत्राम यांना त्यांच्यासोबत मंचावर बसण्यास काहीही हरकत नाही. अशा स्थितीत कार्यकर्ते बुचकळ्यात सापडले आहे. मागील काही महिन्यांपासून अम्ब्रीशराव भाजपच्या अनेक बैठकांना, वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यात अनुपस्थित असतात. अशोक नेते यांचे नामांकन दाखल करण्याच्यादिवशी देखील ते उशिराच आले. पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पण ते गंभीरतेने घेत नाहीत, अशी चर्चा सभास्थळी होती. आता प्रचारात देखील तीच परिस्थिती दिसून येत आहे.

हेही वाचा…पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते

आमदार आंबटकर अहेरीत

अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थितीमुळे सुरू झालेल्या राजकीय चर्चांना पूर्ण विराम देण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते रामदास आंबटकर यांनी आज अहेरी येथे अम्ब्रीशरावांची भेट घेतली. दरम्यान दोघांमध्ये बंदद्वार चर्चा झाली. आंबटकर यांनी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केल्याचे समजते. सोमवारपासून अम्ब्रीशराव प्रचाराला सुरुवात करणार आहेत, अशी माहिती आहे.