नागपूर : तुंबलेली स्वच्छतागृहे, पाण्याचा अभाव, तुटलेली दारे अन् दुर्गंधी!

सरकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा

toilet
(संग्रहीत छायाचित्र)

तुंबलेली स्वच्छतागृहे, पाण्याचा अभाव, तुटलेली दारे आणि श्वास कोंडणारी दुर्गंधी ही स्थिती आहे शासकीय कार्यालयातील स्वच्छतागृहांची. यामुळे महिला कर्मचाऱ्यांची प्रचंड कुचंबणा होत आहे.

सध्या देश आणि राज्यस्तरावर स्वच्छता अभियान राबवणे सुरू आहे. कार्यालयीन स्वच्छतेवरही भर दिला जात आहे. मात्र, या योजनांची शासकीय कार्यालयातच पुरेपूर अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तेथील महिला कर्मचारी व कामानिमित्त कार्यालयात आलेल्या महिलांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात काही महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या असता या समस्येची तीव्रता लक्षात आली. नियमित स्वच्छता होत नसल्याने काही कार्यालयातील स्वच्छतागृहे बंद आहेत. त्यामुळे कार्यालयीन वेळेत महिलांना स्वच्छतागृह उपलब्ध नसते. काही तास कळ सोसत काढावे लागत असल्याने त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. मासिक पाळीच्या काळात सर्वाधिक अडचण असल्याने रजा घ्यावी लागते, असे काही महिलांनी सांगितले. गर्भवतींनाही अशाच समस्येला तोंड द्यावे लागते. तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, शासकीय रुग्णालय आणि टपाल कार्यालयात हीच स्थिती आहे. नियमित देखभाल आणि पाणी नसल्यामुळे स्वच्छतागृहे निरुपयोगी झाली आहेत.

दिव्याखाली अंधार –

स्वच्छतागृहे वापरात नसल्यामुळे तेथे आवश्यक सोयी-सुविधा नाहीत. महिला कर्मचारी दोन रुपये देऊन इतर सार्वजनिक स्वच्छतागृह वापरतात. विशेष म्हणजे, प्रत्येक सरकारी कार्यालयांच्या भिंतींवर स्वच्छता अभियानाच्या जाहिराती आहेत. या योजनांचा प्रसार आम्हीच करीत असलो तरी आम्हीच वंचित असल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Poor condition of toilets in government offices in nagpur msr

Next Story
शाळा प्रवेशव्दारवर फुलांचे तोरण, ; विद्यार्थ्यांच्या स्वागताला शिक्षक …
फोटो गॅलरी