पाच महिन्यांपासून जनरेटरसाठी डिझेलच घेतले नाही

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : शासकीय दंत रुग्णालयात एका रुग्णावर जबडय़ाची शस्त्रक्रिया सुरू असताना २ फेब्रुवारीला वीजपुरवठा खंडित झाला होता. जनरेटरमध्ये डिझेल नसल्याने हा रुग्ण ३० मिनिटे शस्त्रक्रिया टेबलावरच ताटकळत राहिला. वीजपुरवठा सुरू झाल्यावर डॉक्टरांच्या प्रसंगावधानाने रुग्णाची शस्त्रक्रिया पूर्ण होऊन प्राण वाचले. परंतु या जनरेटरमधील डिझेल संपत असल्याचे अधिष्ठात्यांना पाच महिन्यांपूर्वीच कळवले गेले होते. त्यानंतरही डिझेल खरेदी केली गेली नसल्याचे पुढे येत आहे.

नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय वा इतर कोणत्याही रुग्णालयात काही कारणास्तव शस्त्रक्रियेदरम्यान वीज खंडित झाल्यास शस्त्रक्रियेत खंड पडू नये म्हणून जनरेटरची सोय असते. या जनरेटरमध्ये नेहमी डिझेल राहावे म्हणून प्रशासनाने काळजी घ्यायला हवी. दरम्यान, ऑक्टोबर २०२० मध्ये या जनरेटरचे डिझेल संपत असून तातडीने डिझेल खरेदीसाठी अधिष्ठाता कार्यालयाला संबंधित विभागातून प्रस्ताव गेला होता. परंतु करोनामुळे रुग्ण कमी असण्यासह पैसा नसल्याचे सांगत त्याकडे दुर्लक्ष केले गेले. या अक्षम्य चुकीमुळेच २ फेब्रुवारी २०२१ रोजी अकोटच्या रुग्णावर  शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक वीज खंडित झाली. घाबरलेल्या डॉक्टरने स्वत:च्या खिशातून ५०० रुपये देऊन डिझेल बोलावले. परंतु त्यापूर्वीच सुमारे ३० मिनिटांनी वीजपुरवठा पूर्ववत झाला. या काळात रुग्णाची प्रकृती अचानक खालवू नये म्हणून तेथील डॉक्टरांची खूपच दमछाक झाली. या घटनेमुळे दंत प्रशासनच वाऱ्यावर असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे निदान या गंभीर प्रकरणात वैद्यकीय शिक्षण खाते काही चौकशी व कारवाई करेल की  एखाद्या रुग्णाचे प्राण गेल्यावर त्यांना घटनेचे गांभीर्य कळेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अखेर १० हजारांच्या डिझेलची खरेदी

शासकीय दंत महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मंगेश फडणाईक यांना  याबाबत विचारणा केल्यावर तातडीने १० हजार रुपयांचे १२० लिटर डिझेल खरेदी करून ते जनरेटरमध्ये टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.