सर्दी, खोकल्याचे रुग्ण जास्त आढळल्यास सव्‍‌र्हेक्षण-  विजय वडेट्टीवार

नागपूर : खासगी डॉक्टर रुग्णांना देत असलेल्या औषधांच्या चिठ्ठय़ांवरही शासन लक्ष देईल. त्यात सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असलेले रुग्ण एखाद्या भागात जास्त आढळताच तातडीने तेथे सव्‍‌र्हेक्षण, तपासणी केली जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

करोना नियंत्रणासाठी आरोग्य विभागासह इतर खात्यांकडून पूर्ण क्षमतेने काम सुरू आहे. कोणत्या भागात सर्दी, खोकला, तापासह इतर प्रकारच्या औषधांची उचल प्रत्येक महिन्याला सरासरी किती होते, हे तपासले जात आहे. त्यात अचानक  करोनाची लक्षणे असलेल्या आजारांशी संबंधित औषधांची उचल वाढल्याचे निदर्शनात येताच त्या भागावर जास्त लक्ष दिले जाईल. त्यासाठी राज्यातील खासगी डॉक्टरांकडून रुग्णांना लिहून दिल्या जाणाऱ्या चिठ्ठय़ांवर लक्ष दिले जाईल. त्यासाठी खासगी डॉक्टरांच्या विविध संघटनांचीही मदत घेतली जाणार आहे.

करोना तपासणी वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ांत विषाणू प्रयोगशाळा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळे भविष्यात प्रत्येक जिल्ह्य़ांत स्वाइन फ्लू, बर्ड फ्लूसह इतर सगळ्याच तपासण्या होतील. गडचिरोलीत तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार असून तातडीने पद भरणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रक्रिया करून २०२१ पासून येथे शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

सिकलसेलग्रस्तांचा प्रश्न सुटणार

आरोग्य खात्याने राज्यातील नागपूर, पालघर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या सात जिल्ह्य़ांतील सिकलसेल आजार नियंत्रणाचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सेवा समाप्त करत येथील कामाची जबाबदारी आशासह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर टाकली आहे. या कर्मचाऱ्यांना आधीच करोना सव्‍‌र्हेक्षणासह इतरही काम करावे लागत असल्याने सिकलसेलग्रस्तांना न्याय कसा मिळणार, असा प्रश्न लोकसत्ताने पुढे आणला होता. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी थेट आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना भ्रमनध्वनी करून आठ दिवसांत स्वयंसेवी संस्थांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना केल्या.

घरातून नमुने गोळा करण्याबाबत चाचपणी

केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या चौकटीत खासगी डॉक्टरांनी एखाद्या संशयित व्यक्तीला करोना तपासणीचा सल्ला दिला असल्यास त्याची शासनाने मंजुरी दिलेल्या खासगी प्रयोगशाळेच्या माध्यमातून घरातून नमुने गोळा करून तपासणी शक्य आहे काय, याची चाचपणी केली जाईल. परंतु त्यासाठी घरात विलगीकरणासह इतर नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असेल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.