उद्योगपती राहुल बजाज यांचा उद्विग्न सवाल

देशाची आर्थिक घडी सुदृढ करण्यात देशांतर्गत कंपन्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्यामध्येही स्पर्धा असाव्यात म्हणून उदारीकरणाचा आग्रह इंदिरा गांधींपासून होता. विदेशी कंपन्यांना आमचा विरोध नाही, पण त्यांना केंद्र शासनाद्वारे सर्व लाभ व सुविधा पुरवल्या जातात. मात्र, देशांतर्गत असलेल्या कंपन्यांना त्या पुरवल्या जात नाहीत. तेव्हा आम्ही शासनाची सावत्र मुले का, असा प्रश्न उपस्थित करून बजाज ऑटो उद्योगाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर टीकावजा नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रशासकीय भवनाच्या कोनशिला समारंभासाठी नागपुरात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मोदी सरकारच्या १६ महिन्यांच्या कालवधीत बरेच काम झाले आहे. बँकेच्या नवनवीन शाखा उघडल्या. भलेही बँकेत पैसे कमी-अधिक आले. परकीय गुंतवणूक आली. संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये चांगली गुंतवणूक झाली. उद्योगाच्या दृष्टीने पंतप्रधानांचे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधील दौरे यशस्वी झाले. महत्त्वाचे म्हणजे, नरेंद्र मोदी निर्णयक्षम आहेत. त्यामुळे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने मी आनंदी आहे. तरीही पाहिजे तसा सुधार व्हायला वेळ लागेल. १६ महिन्यात नवीन वीज प्रकल्प किंवा महामार्गही होऊ शकणार नाहीत. त्यासाठी पाच वर्षे होण्याची वाट पाहायची का? म्हणूनच प्रत्येक वर्षी सरकारच्या कामाचे मूल्यमापन करावे लागेल. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात चांगले लोक आहेत. अनेक नवीनही आहेत. त्यांना शिकायला वेळ लागेल.
बिहारमधील निवडणुकीनंतर केंद्रीय कॅबिनेटमध्ये फेरबदल करून उल्लेखनीय कामगिरी, एकात्मता आणि चांगली क्षमता असल्याची पाश्र्वभूमी असलेल्यांना मंत्रिमंडळात वाव द्यावा, असे ते म्हणाले. मोदी सरकारवर मी खूष आहे. मात्र, अनेक विधेयके राज्यसभेत अडकल्याने मंजूर झालेली नाहीत, असे ते म्हणाले.