|| देवेश गोंडाणे

निष्क्रियता लपवण्यासाठी विद्यापीठाची नवी शक्कल : – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘नॅक’अधिस्वीकृतीच्या मुदतीमध्ये ‘स्वयंम अध्ययन अहवाल’ सादर केलेला नाही. आता आपली निष्क्रियता लपण्यासाठी विदर्भात अतिवृष्टीमुळे उशीर झाल्याचे कारण विद्यापीठ ‘नॅक’ला सांगणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रशासनाच्या चुका लपवण्यासाठी विद्यापीठाने ही नवी शक्कल लढवल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

प्रत्येक विद्यापीठाने राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचे ‘नॅक’ मूल्यांकन करणे आवश्यक आहे. २०१४ मध्ये प्रभारी कुलगुरू व तत्कालीन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या नेतृत्वात विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळाला होता. या अधिस्वीकृतीची मुदत डिसेंबर २०१९ मध्ये संपत आहे. नियमानुसार अधिस्वीकृतीची मुदत संपण्याच्या तीन महिन्यांपूर्वीच स्वयंअध्ययन अहवाल पाठवणे आवश्यक आहे. हा अहवाल पाठवल्यानंतर ‘नॅक’कडून मुदत संपण्याच्या एका महिन्याच्या आत विद्यापीठाची मूल्यांकन तपासणी होते. त्यानुसार नागपूर विद्यापीठाने तीन महिन्यांआधी म्हणजे सप्टेंबरला अहवाल पाठवणे अपेक्षित होते. परंतु  मुदत संपण्याचा दिवस महिन्याभरावर आला असतानाही विद्यापीठाचे  अहवाल तयार करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाने आपली निष्क्रियता लपवण्यासाठी विदर्भात यंदा मोठी अतिवृष्टी झाली. त्यातच नागपूर विद्यापीठामध्ये विदर्भातील बहुतांश विद्यार्थी शिक्षण घेतात. अतिवृष्टीच्या काळात या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यास  बराच विलंब झाला. या कारणांमुळे  विद्यापीठ मुदतीमध्ये अहवाल सादर करण्यास असमर्थ असल्याचे कारण पुढे केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नियम काय सांगतो?

‘नॅक’च्या नियमानुसार स्वयंम अध्ययन अहवाल पाठवण्यास उशीर झाल्यास त्यासाठी तशी विशेष कारणे आवश्यक असतात. यामध्ये ढगफुटी, भूकंप, वादळाचा समावेश आहे. मात्र, नागपूरसह विदर्भात यावर्षी असे काहीही घडले नसतानाही विद्यापीठ असे कारणे देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘‘नॅक’चा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. सर्व कर्मचारी सुट्टय़ांच्या दिवसामध्येही काम करीत आहेत. वेळोवेळी नॅकचे काही नियम बदलत असल्यामुळे अहवाल तयार करण्यामध्ये विलंब होत असला तरी याचा मूल्यांकनावर कुठलाही परिणाम होणार नाही.’

– डॉ. विनायक देशपांडे, प्रभारी प्र-कुलगुरू.