नागपूर : देशातील वीजनिर्मिती प्रकल्प आणि उद्योगांना आवश्यक कोळसा पावसाळय़ापूर्वी साठवता यावा म्हणून विदेशातून आणलेला कोळसा तसेच विदर्भातील खाणींमधील कोळसा वाहतूक करण्याचा मध्य रेल्वेने पुन्हा विक्रम केला आहे. पावसाळय़ात कोळसा पूर्ण क्षमतेने मिळत नाही. त्यामुळे वीजनिर्मिती प्रकल्पांकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोळशाचा पुरेसा साठा करून ठेवला जातो. शिवाय यावर्षी एप्रिल महिन्यादरम्यान अपुऱ्या कोळशामुळे वीजटंचाई निर्माण झाली होती. त्याचे खापर राज्य सरकारने केंद्रावर आणि रेल्वेवर फोडले होते. त्यामुळे रेल्वेने जून महिन्यात पुरेशा मालगाडय़ा उपलब्ध करून कोळसा वाहतूक योग्यप्रकारे व्हावी, यासाठी प्रयत्न केले. त्यातून हा विक्रम झाला आहे.मध्य रेल्वेने जून २०२२ मध्ये मुंबई विभागातील धरमतर बंदर साईिडगवरून आयातीत कोळशाची ३० मालगाडय़ांनी (रेक) तर नागपूर विभागाने या महिन्यात ९०१ मालगाडय़ांनी कोळशाची वाहतूक केली.  या विभागात गेल्यावर्षी जून महिन्यात ७५४ मालगाडय़ांनी वाहतूक झाली होती. नागपूर विभागाने जून २०२२ या महिन्यात बल्लारपूर येथून लोहखनिजाची ६४ मालगाडय़ांनी वाहतूक केली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने २१.६२ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली तर एप्रिल ते जून २०२१ या कालावधीत १८.५४ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली गेली होती. त्यात १६.६१ टक्के वाढ दिसून आली आहे. मध्य रेल्वेने जून २०२२ मध्ये ऑटोमोबाईल्सच्या ८८ मालगाडय़ा पाठवल्या. गेल्यावर्षी जूनमध्ये ३३ मालगाडय़ांद्वारे वाहतूक झाली होती. जून २०२२ मध्ये  २५ मालगाडय़ांनी अन्नधान्याची वाहतूक केली गेली.  तसेच जून २०२१ मध्ये ७४ मालगाडय़ांच्या तुलनेत जून २०२२ मध्ये साखरेची १०१ मालगाडय़ांनी वाहतूक करण्यात आली.

मध्य रेल्वेने मालवाहतुकीमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.  जून २०२२ मध्ये ७.१९ दशलक्ष टन मालवाहतूक झाली आहे. ती जूनमधील आजवरची सर्वोत्तम माल वाहतूक आहे. जून २०२१ मध्ये नोंदणीकृत ५.९७ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत या महिन्यातील मालवाहतुकीत २०.४४ टक्के वाढ दिसून आली आहे. 

– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record transport coal central railway power generation project industries ysh
First published on: 02-07-2022 at 00:02 IST