scorecardresearch

कोलनच्या कर्करोगावर दहापट प्रभावी औषधांचा शोध ; प्रा. डॉ. संजय के. जैन यांचे संशोधन

नागपुरात आयोजित ‘इंडियन फार्मास्युटिकल्स काँग्रेस’मध्ये सहभागी झालेल्या डॉ. जैन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली. डॉ. जैन म्हणाले, जीवनशैलीतील बदल, खानपानाच्या वाईट सवयींसह इतरही कारणांनी कोलनचे कर्करुग्ण वाढत आहेत.

कोलनच्या कर्करोगावर दहापट प्रभावी औषधांचा शोध ; प्रा. डॉ. संजय के. जैन यांचे संशोधन
प्रा. डॉ. संजय के. जैन

महेश बोकडे

नागपूर : कोलनचे (मोठी आतडी म्हणजे अन्नपचन संस्थेचा शेवटचा अवयव) कर्करुग्ण वाढत आहेत. मध्य प्रदेशातील सागर येथील डॉ. हरीसिंग गौर विश्वविद्यालयचे माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय के. जैन यांनी २० वर्षांच्या संशोधनातून नॅनो पार्टिकलमध्ये असलेल्या कोलनच्या कर्करोगावर लक्षित औषधांचा शोध लावला. हे औषध विद्यमान औषधांहून दहापट प्रभावी असल्याचे उंदरावरील चाचणीतून पुढे आले आहे. मानवावर मात्र अद्याप चाचणी झालेली नाही.

नागपुरात आयोजित ‘इंडियन फार्मास्युटिकल्स काँग्रेस’मध्ये सहभागी झालेल्या डॉ. जैन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली. डॉ. जैन म्हणाले, जीवनशैलीतील बदल, खानपानाच्या वाईट सवयींसह इतरही कारणांनी कोलनचे कर्करुग्ण वाढत आहेत. सध्या कोलनच्या कर्करोगाच्या रुग्णांना सलाईनद्वारे वा तोंडाद्वारे औषध दिले जाते. त्यामुळे औषधांची मात्रा जास्त लागते आणि त्याचा प्रतिकूल परिणामही होतो. हे टाळण्यासाठी मी संशोधन सुरू केले. कॅप्सूल वा टॅब्लेटमधून घेता येईल अशा नॅनो पार्टिकलमध्ये औषधांची रचना केली. या लहान औषधांवर विशिष्ट रसायनाचे आवरण टाकले. त्यामुळे हे औषध तोंडावाटे घेतल्यावर ते थेट अन्न नलिकेतील शेवटचा भाग असलल्या कोलनमधील कर्करोगाच्या पेशीजवळ जाईल. त्यानंतर त्याचे परिणाम दिसायला लागतात, असे डॉ. जैन यांनी सांगितले.

या औषधांची उंदरावरील चाचणी यशस्वी झाली आहे. अभ्यासात नवीन औषध विद्यमान औषधांहून सहापट जास्त प्रभावी असल्याचे निष्पन्न झाले. परंतु, खर्च खूप जास्त असल्याने अद्याप या औषधांची मानवी चाचणी झालेली नाही. परंतु, त्यासाठी विविध संस्थांबरोबर पाठपुरावा सुरू असल्याचेही डॉ. जैन म्हणाले. डॉ. संजय जैन यांना २०१८ मध्ये याच संशोधनासाठी राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे, हे विशेष.

सरकारने धोरण ठरवावे’
देशाच्या अनेक संस्थांमध्ये औषधांबाबत विविध संशोधने होतात. त्यापैकी बरीच संशोधने महत्त्वाची असून, त्याचा भविष्यात रुग्णांना लाभ होऊ शकेल. त्यासाठी या औषधांवर आणखी काम करण्याची गरज आहे. परंतु, आर्थिक तरतूद नसल्याने हे संशोधन पुढे जात नाही. सरकारने त्यासाठी नवीन धोरण ठरवण्याची गरज आहे, असेही डॉ. संजय जैन यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 03:15 IST

संबंधित बातम्या