अकोला : अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास वर्ग महिला व सर्वसाधारण महिलांचे नव्याने आरक्षण आज काढण्यात आले. यामुळे राजकीय समीकरणामध्ये बदल झाला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी गेल्या मंगळवारी प्रमिलाताई ओक सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. २० प्रभागांतून ८० सदस्यांचे आरक्षण काढण्यात आले. ८० पैकी १४ अनुसूचित जाती, दोन अनुसूचित जमाती, नामाप्र २१ व सर्वसाधारण गटांसाठी ४३ जागा आरक्षित झाले. त्यामध्ये महिलासांठी अनुसूचित जातीच्या सात, अनुसूचित जमाती एक, नामाप्र ११ आणि सर्वसाधारण महिलांसाठी २१ अशा ५० टक्के म्हणजेच ४० जागा महिलांसाठी आरक्षित निघाल्या. आरक्षण निश्चित झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते.
आरक्षणातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नामाप्र प्रवर्ग सोडतीद्वारे निश्चित केलेले आरक्षण राज्य निवडणूक आयोग यांनी कायम ठेऊन नामाप्र व सर्व साधारण महिलांचे आरक्षण पुन्हा सोडतीद्वारे निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी शासनाने २० मे २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या तरतुदीमधील नियम ६ (३) व ६ (४) नुसार नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्व साधारण महिला यांचे आरक्षण निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी तत्काळ पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार महापालिकेच्या सभागृहात आज नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्व साधारण महिला यांचे आरक्षण थेट व सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आरक्षणाची सोडत काढली.
त्यानुसार अनुसूचित जाती महिलेसाठी प्रभाग क्रमांक २, ३, ५, ६, ७, १४ व १८ सर्व अ आरक्षित झाले. नामाप्र महिलेसाठी प्रभाग क्रमांक ८ आणि १० अ, ३, ४, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६ व २० सर्व ब आरक्षित झाले आहेत. १९ क देखील नामप्र महिलेसाठी आरक्षित आहे. नामाप्र व अनुसूचित जाती महिला आरक्षण बदलल्याने इतरही काही जागांमध्ये बदल झाला आहे. या बदलेल्या आरक्षणाचा प्रभागनिहाय राजकीय समीकरणावर परिणाम होणार आहे. काही इच्छुकांना पर्यायी जागांचा शोध घ्यावा लागेल. तर काही इच्छूक आपल्या घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या तयारीत लागले आहेत. आरक्षणामुळे काहींची कोंडी झाल्याचे चित्र आहे.
