मेडिकल, मेयो, सुपरमधील मृत्यूचा टक्का वाढला; निवासी डॉक्टरांचा ‘कॅन्डल मार्च’

मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, डॉ. आंबेडकर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सुरू केलेल्या सामूहिक रजा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व रुग्णालयांतील व्यवस्था कोलमडली. अनेक रुग्णांना जबरदस्तीने सुटी देण्यात आली. दरम्यान, आंदोलनामुळे तिन्ही संस्थेतील रुग्णांच्या मृत्यृचे प्रमाण वाढले असून डॉक्टर आणि प्रशासनाच्या वादात रुग्ण भरडले जात आहेत.

निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेधार्थ, सुरक्षेच्या व्यवस्थेची मागणी करीत निवासी डॉक्टरांचे राज्यभर सामूहिक रजा आंदोलन सोमवारपासून सुरू आहे. नागपुरातील डॉक्टरही त्यात सहभागी झाले असून आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. मंगळवारी शहरातील तीनही इस्पितळातील रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली होती. गंभीर नसलेल्या रुग्णांना सुटी दिली जात होती. रुग्णांचे विविध तपासणी अहवाल अडकून पडल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.

तीनही रुग्णालयातील दीडशेहून जास्त शस्त्रक्रिया रखडल्याची माहिती आहे. रुग्णांना डॉक्टराची प्रतीक्षा असल्याचे चित्र विविध वार्डात पाहायला मिळाले. निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर असल्यामुळे मेडिकलच्या बाह्य़रुग्ण विभागात केवळ २,४२९ रुग्णांची नोंद झाली. दाखल आंतररुग्णांची संख्याही केवळ ६५ होती. तेव्हा अनेक रुग्णांना येथे दाखलही करवून घेण्यात आले नाही. मेयोसह सुपरस्पेशालीटी रुग्णालयातही हीच स्थिती होती. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होणार नसल्याचा व प्रशासनाने पुरेसी व्यवस्था केल्याचा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले.

मेडिकल या एकाच रुग्णालयात सोमवारी सकाळी ८ ते मंगळवारी सकाळी ८ या चोवीस तासांच्या कालावधीत तब्बल १४ मृत्यू नोंदवण्यात आले.

दररोज येथे ८ ते १० मृत्यू नोंदवले जातात. मेयो व सुपरमध्येही मृत्यूचा टक्का वाढल्याची माहिती आहे. मेडिकल, मेयो, लता मंगेशकर रुग्णालयातील निवासी डॉक्टर एकत्र आले. त्यांनी संध्याकाळी ६.५० वाजता मेडिकल कॉलेज चौक ते तुकडोजी पुतळा होत सुपरस्पेशालीटी रुग्णालयापर्यंत ‘कॅन्डल मार्च’ काढला.

याप्रसंगी निवासी डॉक्टरांनी नागरिकांपुढे विना सुरक्षा कसे काम करायचे? हा प्रश्न उपस्थित केला. मार्चमध्ये पदवी अभ्यासक्रम करणारे विद्यार्थीही सहभागी झाले होते.

मेडिकल व मेयो प्रशासनाकडून मंगळवारी सामूहिक रजेवरील निवासी डॉक्टरांना न्यायालयाने तातडीने सेवेवर हजर राहण्याचे आदेश दिल्याचे सांगत रात्रीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. डॉक्टर सेवेवर हजर न झाल्यास कारवाईचे आदेश असल्याचेही त्यात सांगण्यात आले आहे.

अपघातग्रस्त सुशीलला फटका

अमरावती जिल्ह्य़ातील अचलपूर तालुक्यातील मल्हार गावच्या शेतकरी कुटुंबातील सुशील ज्ञानेश्वर भुरंबे (२२) याचा ४ मार्चला अपघात झाला. त्याच्या पायालाआणि तोंडालाही दुखापत झाली होती. त्याला  मेडिकलमध्ये आणल्यावर पाय आणि तोंडावर उपचार अपेक्षित होते. परंतु पायावरच उपचार करून त्याला मंगळवारी सुटी देण्यात आली. तोंडाचे हाड मोडल्यामुळे काहीही खाता येत नसून त्याला वारंवार शौचचा त्रास आहे. सुशील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या पुढे कुटुंबीयासह  चादरेवर झोपला होता.

रुग्णांना त्रास होऊ देणार नाही

मेडिकलमध्ये प्राध्यापकांपासून वरिष्ठ निवासी डॉक्टरांना प्रत्येक रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या असून ते सेवा देत आहेत. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला कुणाच्याही तक्रारी आल्यास तातडीने त्या सोडवण्याच्या सूचना आहे. रुग्णांना सक्तीने सुटी देणे शक्य नसून या प्रकरणाची चौकशी केली जाईल. प्रशासनाकडून एकाही रुग्णांना त्रास होऊ देणार नसल्याची माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दिली. मेयो व सुपरच्या प्रशासनाकडूनही रुग्णांना त्रास होऊ न देण्याचे प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला.

सेलिब्रेटींना सुरक्षा, जीव वाचवणारे वाऱ्यावर

निवासी डॉक्टरही मानसेच असून त्यांनाही जीव आहे. आम्ही सेवेकरिता कधीच नकार दिला नाही. परंतु धुळे येथे डॉक्टरांना मारहाण झाली. त्यानंतरही हा प्रकार थांबवण्यात शासनाला यश आले नसल्याने नाशिक, औरंगाबादसह मुंबईतील मारहाणीतून स्पष्ट होते. शासनाने निवासी डॉक्टरांना वारंवार सुरक्षा देण्याची लेखी हमी दिल्यावरही मागणी पूर्ण केली नाही. सुरक्षेसंबंधित न्यायालयाच्या सूचनाही पाळल्या नाहीत. मेडिकल व मेयोत आंदोलन सुरू असतांना स्थानिक प्रशासन चर्चाही करीत नाही. त्यातच बंदिवानाच्या मृत्यूवरही पुढे येणाऱ्या मानवाधिकार व सामाजिक संस्थांनाही डॉक्टरांच्या वेदना दिसत नसल्याचे चित्र आहे. या प्रकाराने शासनाकडून सेलिब्रेटींना सुरक्षा देणाऱ्या शासनाने जीव वाचवणाऱ्या डॉक्टर वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्या त्वरित पूर्ण होऊ शकत नसल्या तरी प्रशासनासोबतच्या चर्चेतून त्या सुटू शकतात. परंतु ते झाले नसल्याने आंदोलन चिरघडले, अशी माहिती निवासी डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत दिली.