विद्यार्थी संघटनांकडून मात्र विरोध

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) ५०२ पदांसाठी झालेली परीक्षा काळ्या यादीतील ‘मेसर्स अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनी’कडून घेण्यात आल्याच्या आरोपानंतरही ‘एमआयडीसी’ या परीक्षांचा निकाल १५ डिसेंबरला जाहीर करणार आहे. विद्यार्थी संघटनांकडून याला विरोध होत आहे.

राज्यात दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील गट-ब, क आणि ड संवर्गातील सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी ‘महाआयटी’कडून चार कंपन्यांची निवड करण्यात आली. एमआयडीसीच्या ५०२ पदांची परीक्षा २० ते २७  ऑगस्टदरम्यान मेसर्स अ‍ॅपटेक लिमिटेड या काळ्या यादीतील कंपनीकडून घेण्यात आली. २०२० मध्ये दिल्ली सरकारमधील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत गोंधळ झाल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने, तर उत्तर प्रदेश सरकारमधील कनिष्ठ विद्युत अभियंता पदासाठी झालेल्या भरती प्रक्रियेसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मेसर्स अ‍ॅपटेक लिमिटेडला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. असे असतानाही या कंपनीकडून परीक्षा घेण्यात आल्या असून एमआयडीसी या परीक्षांचा निकाल १५ डिसेंबरला जाहीर करणार आहे. काळ्या यादीतील कंपनीकडून झालेल्या परीक्षेवर विश्वास नसल्याने एमपीएससी समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

अ‍ॅपटेक कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा न्यायालयाचा आदेश असतानाही महाआयटी आणि राज्य सरकार अशा कंपन्यांना पाठीशी घालत आहे. ही परीक्षा रद्द न करता त्याचा निकाल लावला जात आहे. यात होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

– राहुल कवटेकर, अध्यक्ष, एमपीएससी समन्वय समिती.