आयोजकांकडून चार नावांचा प्रस्ताव, आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे उद्घाटकपदाचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याने टीकेचे धनी  ठरलेल्या साहित्य महामंडळाने आता उद्घाटनासाठी नवीन साहित्यिकाचा विचार सुरू केला आहे. एकूण चार नावे आयोजकांनी पाठविली असून महामंडळानेही काही नावे पाठवली आहेत. त्यातील एका नावावर बुधवापर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आयोजकांना संदेश पाठवून उद्घाटक म्हणून नवीन नावे सुचविण्यास सांगितले. त्यानुसार आयोजकांनी प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार, प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ, ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार आणि शेगाव देवस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची नावे महामंडळाला पाठवली आहेत.

ही चार नावे आणि महामंडळाच्या विचाराधीन असलेली काही नावे यातून नवीन उद्घाटकाची निवड केली जाणार आहे. परंतु  आयोजकांनी जी चार नावे सुचवली आहेत त्यातील कुणीही हे उद्घाटकपद स्वीकारेल, याची तीळमात्र शक्यता नाही. किंबहुना त्यासाठीच आयोजकांनी अगदी ठरवून हीच नावे सुचवली असून यातून कोणालाही संपर्क करताना महामंडळ अध्यक्षांची कोंडी होईल हे स्पष्ट आहे. या नावांवर महामंडळ विचार करते की स्वत:च्या मर्जीतील एखादे नाव पुढे आणते याकडे आता साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे.

‘सरकारचाच कट’

नयनतारा सहगल यांना ऐनवेळी उद्घाटक म्हणून न येऊ देण्यामागे भाजप सरकारचाच हात आहे. सहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या माध्यमातून सरकारनेच हा कट रचल्याचा आरोप शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केला आहे.  त्यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, एका मराठी वाहिनीला प्रतिक्रिया देताना जोशी म्हणाले, की जोपर्यंत साहित्य महामंडळाला स्वत:च्या आर्थिक बळावर संमेलन भरवता येणार नाही तोपर्यंत असे प्रकार होणारच. यातून जोशींनी या कटाचा सूत्रधार भाजप सरकारच असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. शिवाय या अपमानजनक निमंत्रण घोळाबाबत सर्वानीच दु:ख व्यक्त करून या निर्णयाचा निषेध केला. परंतु जोशी यांची प्रतिक्रिया मात्र अत्यंत अहंकाराने भरलेली असून अशा घटना होतच असतात अशी कोडगी भूमिका त्यांनी घेतली, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले आहे.

महामंडळ अध्यक्षांचा ‘मौनराग’

महामंडळाचे अध्यक्ष गेले दोन दिवस,  रात्रंदिवस केवळ माध्यमांच्याच सेवेत असल्याने अन्य  कोणतेही काम करू शकलेले नाहीत. संपूर्ण दमणूक झालेले आहेत. प्रकृती ठीक राखून  असलेल्या जबाबदाऱ्या त्यांना कृपया  पार पाडू द्याव्यात. १३ जानेवारीला संमेलनाचा समारोप होईपर्यंत कोणत्याही विषयावर ते माध्यमांना उपलब्ध होऊ  शकणार नाहीत. जे जे सांगायचे  ते सर्व सांगून झाले आहे. यानंतर कृपया कोणत्याही विषयावर संपर्क न साधून त्यांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी वेळ देऊन  सहकार्य करावे ही नम्र विनंती, असे आवाहन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Search for the new inauguration of the sahitya sammelan
First published on: 09-01-2019 at 02:41 IST