शहरात एकाच विकास प्राधिकरणाचा आग्रह

नागपूर : शहरात एकच विकास यंत्रणा असावी, असा आग्रह धरत सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज गुरुवारी महापालिकेच्या विशेष सभेत नागपूर सुधार प्रन्यास पुनर्जीवित करण्यास कडाडून विरोध केला.

नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता आणि त्याला पुनर्जीवित करण्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला अहवाल मागितला होता. यावर चर्चा करण्यासाठी आज महापालिकेची विशेष सभा बोलवण्यात आली होती. सभेत काँग्रेस, बसपासह भाजपच्या सदस्यांनी  नासुप्र पुनरुज्जीवित करण्यास विरोध केला. चर्चे दरम्यान आरोप-प्रत्यारोप झाले. भाजप सदस्यांनी पालकमंत्री नितीन राऊत  यांचा निषेध केला.  मुख्यमंत्री कार्यालयाचे  पत्र सभागृहात ठेवावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी यांनी केली.

नासुप्र बरखास्तीचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्यामुळे या विषयावर सभागृहात निर्णय घेता येत नसल्याचे सांगत काँग्रेसचे सदस्य संदीप सहारे यांनी चर्चा करण्यास विरोध केला. मात्र प्रवीण दटके यांनी या विषयावर सदस्यांना मते मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. नागपूर सुधार प्रन्यासमुळे शहरातील ५७२ व १९०० ले आऊटमध्ये नगरसेवकांना कामे करता येत नाही. लेआऊटमधील लोक नगरसेवकांकडे तक्रारी घेऊन येत असतात. नासुप्रमध्ये नागरिकांची कामे होत नसून त्या ठिकाणी केवळ भ्रष्टाचार होत असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली. आभा पांडे म्हणाल्या, नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त झाले नाही तर नियोजन विभाग महापालिकेत देण्याचे आदेश शासनाने काढले होते आणि हे आदेश सुद्धा अर्धवट होते. नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी  जनतेला जो त्रास भोगावा लागला त्याला महापालिका सुद्धा जबाबदार आहे. यावेळी अविनाश ठाकरे, रवींद्र भोयर, पुरुषोत्तम हजारे, मनोज सांगोळे, संजय महाकाळकर, जुल्फेकार भुट्टो, उज्ज्वला बनकर, नेहा निकोसे, दिव्या धुरडे, प्रकाश भोयर, मो. जमाल आदी सदस्यांनी मते व्यक्त केली.

काय म्हणतात नगरसेवक?

नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीचा निर्णय भाजपने केवळ राजकीय फायदा मिळावा म्हणून घेतला. अजूनही हस्तांतरणाची पक्रिया झाली नाही. बरखास्तीची घोषणा ही फसवी असली तरी शहरात एकच विकास यंत्रणा असली पाहिजे. – प्रफुल्ल गुडधे, काँग्रेस नगरसेवक.

शहराचे नियोजन बिघडवण्यात नागपूर सुधार प्रन्यासची मोठी भूमिका आहे. या पार्श्वभूमीवरमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नासुप्र बरखास्तीचा निर्णय घेतला होता. पण, दुर्दैवाने विद्यमान पालकमंत्र्यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून नासुप्र पुनरुज्जीवित करण्यासाठी जी मागणी केली तिचा मी निषेध करतो. – प्रवीण दटके, माजी महापौर.

आजच्या चर्चेत  सर्वानी नासुप्र पुनरुज्जीवित करण्याला विरोध केला. नासुप्रने मोठय़ा प्रमाणावर विकास योजना मंजूर केली. मात्र विकास कामे झाली नाहीत. – संदीप जाधव, सत्तापक्ष नेता.