सुरक्षा रक्षकाने दांडी मारल्याने एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसला. सुरक्षा रक्षक कर्तव्यावर हजर नसल्याची संधी साधून चोरट्यांनी अधिकाऱ्याच्या घरी दरोडा घातला आणि तब्बल ३० तोळे सोने व पाच लाखांची रोख लंपास केली. शहरातील बालाजी सोसायटीमध्ये मंगळवारी घडलेल्या या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली.

रंगोली मैदान परिसरातील बालाजी सोसायटीत बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले यशवंत लखानी हे कुटुंबीयांसह राहतात. ते २ सप्टेंबरला बंगळुरू येथे मुलीकडे गेले होते. बंगळुरूला जाण्यापूर्वी त्यांनी सुरक्षा एजन्सी संचालक संजय सुरावार यांच्यामार्फत शंकर पोरजेलवार याला सुरक्षा रक्षक म्हणून नेमले होते. दरम्यान, सुरावार लखानी यांच्या घराची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना घराचे मागील दार तोडलेले दिसले. त्यांनी ही बाब तत्काळ लखानी यांना कळविली. लखानी यांच्या नातेवाईकांनी घर गाठून पाहाणी केली असता, घरातील संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त आढळले.

गडचिरोली : नरभक्षी सीटी १ वाघाचा शोध सुरूच; आतापर्यंत घेतले १२ बळी

ही माहिती अवधुतवाडी पोलिसांना देण्यात आली. लखानी तातडीने बंगळुरूहून परतले. घरातील लॉकरमधून सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, अंगठी, कानातले रिंग, ब्रेसलेट, हातातील कडे, आदी तीस तोळे सोन्याचे दागिने आणि पाच लाखांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांना आढळले. बंगळुरूला जाण्यापूर्वी लखानी यांनी नेमलेला सुरक्षा रक्षक कर्तव्यावर हजरच नव्हता, अशी बाब पोलीस तपासात उघड झाली. कुटुंबातील सदस्य आणि सुरक्षा रक्षक घरी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी लखानी यांच्या घरात प्रवेश करीत लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

हेही वाचा : अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर, म्हणाले “जी निराशा…”

सराईत चोरट्यांचा शोध सुरू

या घटनेनेनंतर पोलिसांनी ठसेतज्ञ, श्वानपथक, आदींना घटनास्थळी पाचारण केले. यानंतर परिसरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासणी करण्यात आली. शहरातील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू आहे. एलसीबीने चोरट्यांच्या शोधासाठी एक पथक नेमले असून तेही या प्रकरणातील संशयितांची चौकशी करीत आहे.