नागपूर : भारतातील वाघांच्या मृत्यूची आकडेवारी सातत्याने वाढत असून यावर्षी वाघाच्या मृत्यूने शंभरी गाठली आहे. वाघांच्या मृत्यूचा आकडा यावर्षी १२७ वर गेला आहे. वर्षांच्या पूर्वार्धात ७७ तर  उत्तरार्धात ५० वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघांचे सर्वाधिक मृत्यू मध्यप्रदेशात झाले असून महाराष्ट्र दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.

व्याघ्रगणनेदरम्यान भारतात वाघांची संख्या वाढलेली दिसून येत असली तरीही मृत्यूच्या वाढत्या आकडेवारीने व्याघ्रसंरक्षणाचे मोठे आव्हान वनखात्यासमोर उभे ठाकले आहे. वाघांच्या मृत्यूची ही आकडेवारी राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने दिली आहे, पण याव्यतिरिक्त किमान महाराष्ट्रात तरी वनखात्याने गेल्या सहा महिन्यात शिकारीच्या अनेक घटना उघडकीस आणल्या आहेत. यात वाघांचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. इतर राज्यातही अशा कारवाया होत आहेत. त्यामुळे वाघांच्या मृत्यूची ही आकडेवारी अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘क्ला’- कन्झर्वेशन लेन्सेस अँड वाईल्डलाइफ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीव क्षेत्रात काम करत आहे. या संस्थेकडून वाघांच्या मृत्यूसंदर्भात माहिती संकलित केली जाते. या संस्थेच्या अहवालानुसार, भारतात पहिल्या सहा महिन्यात ८६ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. या संस्थेचा वार्षिक अहवाल यायचा आहे. त्यामुळे पहिल्या सहा महिन्याची आकडेवारी पाहता ही आकडेवारी देखील मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतातील एकूण मृत्यूमध्ये ३१ वाघीण व ६६ वाघांचा समावेश आहे.  उर्वरित २८ वाघ आहेत की वाघीण याची ओळखच पटलेली नाही. वाघाचे सर्वाधिक मृत्यू मध्यभारतात आहेत. पहिल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ मृत्युमुखी पडले होते.  त्यानंतर चित्र पालटले आणि मध्यप्रदेशात वाघांचे सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले. महाराष्ट्रात नवीन वर्षांची सुरुवातच एक वाघीण आणि तीन बछडय़ांच्या शिकारीने झाली होती.  वर्षांची अखेर देखील वाघिणीच्या मृत्यूने झाली. या संपूर्ण वर्षांत २७ वाघांच्या मृत्यूची नोंद महाराष्ट्रात झाली.