खासगी बसच्या दारात उभं राहून डोकं बाहेर काढणं एका बस वाहकाच्या जीवावर बेतलं आहे. चुकीच्या दिशेनं आलेल्या ट्रकने खासगी बसला धडक दिल्यानंतर दारात उभा असलेल्या वाहकाचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. संबंधित वाहक ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडला आहे. ही घटना कपिलनगर हद्दीत कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौकात घडली.

नीरज मोतीलाल प्रजापती असं मृत पावलेल्या २२ वर्षीय वाहकाचं नाव असून तो गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील रहिवासी होता. तर बसचालकाचं नाव निलेश्वर भुरे (३७) आहे. बसचालक भुरे हे सरांडी येथील अमोल जयस्वाल यांच्या मालकीच्या रामकिशन ट्रॅव्हल्सच्या बसवर चालक म्हणून काम करतात. शनिवारी रात्री मोहाडी येथील दिलीप लांजेवार यांच्या कुटुंबातील लग्न ऑटोमोटिव्ह चौकातील केएमसी लॉन येथे होते.

रात्री ८ च्या सुमारास भुरे यांनी खासगी बसमधून वऱ्हाडींना विवाहस्थळी आणलं. रात्री एकच्या सुमारास लग्नसोहळा आटोपल्यानंतर भुरे यांनी पाहुण्यांना बसमध्ये बसवलं आणि मोहाडीला जाण्यास निघाला. दरम्यान बसचालकाला रस्ता दाखवण्यासाठी नीरज डोकं बाहेर काढून दारात उभा होता. याचवेळी चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने अतिशय वेगात बसला डाव्या बाजूने धडक दिली.

हा अपघात घडताच दारात उभा असलेला नीरज खाली पडला आणि ट्रकच्या मागील चाकात सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कपिलनगर पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करत ट्रकचालक धर्मपाल लक्ष्मण गुर्जर (वय-२६, टहला, जि. महेंद्रगड, हरियाणा) याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.